वेगळे विदर्भ राज्य निर्माण होईपर्यंत संघर्ष सुरू ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2017 01:06 AM2017-02-03T01:06:48+5:302017-02-03T01:06:48+5:30
राष्ट्रपतीचा विदर्भ दिल्याचा छापील आदेश प्राप्त होईपर्यंत आम्हाला लढा देत राहणे आवश्यक आहे.
श्रीनिवास खांदेवाले : स्वतंत्र विदर्भासाठी कार्यक्रम
चंद्रपूर : राष्ट्रपतीचा विदर्भ दिल्याचा छापील आदेश प्राप्त होईपर्यंत आम्हाला लढा देत राहणे आवश्यक आहे. त्यासाठी आपला प्रत्येकाचा आत्मविश्वास पक्का होणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे आवाहन नागपूर येथील अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष अॅड. मोरेश्वर टेमुर्डे उपस्थित होते. प्रमुख उपस्थिती म्हणून राजू बोरकर, नगरसेवक सुधीर सातपुते, प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना डॉ. खांदेवाले म्हणाले की, आमच्या विदर्भात पाणी, खनिज, विद्युत व वनसंपदा विपुल प्रमाणात आहे. तरी ही आम्ही गरीब का? कारण आम्हाला हेतूपुररस्परर गरीब ठेवण्यात आले. निधीच मिळाला नाही तर प्रगती कशी होणार? गेली ५०-६० वर्षे मार्च महिन्याच्या बजेटमध्ये भरपूर निधी विदर्भाला द्यायचा. परंतु खर्च करायची परवानगी द्यायची नाही. तिकडे पश्चिम महाराष्ट्रात निधी खर्च करायचा. नागपूर येथे विधानसभेचे अधिवेशन आतापर्यंत कुठे किती निधी खर्च झाला आणि ज्यांचा शिल्लक आहे, तो काढायचा व ज्यांनी जास्त खर्च केला त्यांना द्यायचा आहे हे धोरण ठरविण्यासाठी घेण्यात येते. इकडचा पैसा वाचवा आणि तिकडे देवून टाका, अशाप्रकारे विदर्भाचे शोषण पद्धतशीरपणे नियमात बसवून सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला.
प्रास्ताविक राजू बोरकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे यांनी दिला. संचालन डॉ. यशवंत घुमे यांनी व आभार सुधीर सातपुते यांनी मानले. (प्रतिनिधी)