मेडिकल कॉलेजसाठी हालचाली सुरू
By admin | Published: June 4, 2014 11:36 PM2014-06-04T23:36:49+5:302014-06-04T23:36:49+5:30
चंद्रपूर शहरात होऊ घातलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेच्या हालचालींनी आता वेग घेतला आहे. दिल्लीतील मेडीकल काऊंसिल ऑफ इंडियाची एक त्रिसदस्यीय समिती या पार्श्वभूमीवर बुधवारी
वैद्यकीय सेवेची केली पाहणी : दिल्लीतील समिती चंद्रपुरात दाखल
चंद्रपूर : चंद्रपूर शहरात होऊ घातलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेच्या हालचालींनी आता वेग घेतला आहे. दिल्लीतील मेडीकल काऊंसिल ऑफ इंडियाची एक त्रिसदस्यीय समिती या पार्श्वभूमीवर बुधवारी चंद्रपुरात दाखल झाली. या समितीने आज दिवसभर जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय सेवेची बारकाईने पाहणी केली.
चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा म्हणून नावारुपास आला आहे. उद्योग असल्यामुळे अपघाताच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. याशिवाय प्रदूषित शहर म्हणूनही चंद्रपूरची ओळख झाली आहे. त्यामुळे विविध आजाराने जिल्ह्यात शिरकाव केला आहे. एखाद्यावेळी रस्ता अपघात किंवा उद्योगात अपघात झाल्यास त्याला नागपूर येथे न्यावे लागते. अशावेळी वेळेवर उपचार न मिळाल्याने रुग्णाचा वाटेतच जीव जातो. अशा घटना अनेकदा घडल्या आहेत. या पार्श्वभूमिवर शासनाने चंद्रपुरात वैद्यकीय महाविद्यालय देण्याची घोषणा केली. त्यानंतर जागेसाठी प्रस्ताव अडला होता. अखेर बायपास मार्गावरील जागा वैद्यकीय महाविद्यालयासाठी निश्चित करण्यात आली.
आता वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. यासाठी दिल्लीतील मेडीकल काऊंसिल ऑफ इंडियाची एक त्रिसदस्यीय समिती आज चंद्रपुरात दाखल झाली. या समितीत मौलाना आझाद मेडीकल कॉलेज आग्राचे डॉ. अग्रवाल, जबलपूर मेडीकल कॉलेजचे मेडीसीन विभागाचे एचओडी डॉ. पाराशर व दिल्ली मेडीकल कॉलेजचे डॉ. बालकृष्णन यांचा समावेश आहे.
या समितीने आज दुपारी १ वाजताच्या सुमारास येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद सोनुने, डॉ. अनंत हजारे, इंडियन मेडीकल असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे उपस्थित होते. समितीने रुग्णालयातील ऑपरेशन थिएटर, अतिदक्षता विभाग, गायनोकोलॉजी विभाग, अपघात विभाग, मेडीसीन विभाग, शवविच्छेदन विभाग, प्रसुति विभाग यासह सर्व विभागाला भेटी दिल्या. तिथे कर्मचारी संख्या व यंत्रसामुग्रीची पाहणी केली. याशिवाय इतर कुठल्या सुविधा नाहीत, याचीही नोंद केली. जिल्हा सामान्य रुग्णालय हे ३00 खाटांचे आहे. मात्र आज या ठिकाणी ४५0 रुग्ण दाखल असल्याचेही समिती सदस्यांना आढळले. त्यानंतर समितीने ब्लड बँक, टेलीमेडीसीन सेंटरचीही पाहणी केली. वैद्यकीय महाविद्यालयासाठी सुविधांची तरतूद व सध्या उपलब्ध सुविधा याची तुलनाही या समितीने केली.
दुपारी अडीच वाजताच्या सुमारास ही समिती टीबी हॉस्पीटलकडे रवाना झाली. तिथे १00 खाटांचे रुग्णालय आहे, त्याचीही पाहणी केली.
यादरम्यान ही जागा वैद्यकीय शिक्षणासाठी उपलब्ध करून दिल्यास वैद्यकीय महाविद्यालय तातडीने सुरू होण्यास मदत होईल, असे डॉ. गुलवाडे यांनी लक्षात आणून दिले. त्यानंतर समितीतील डॉ. अग्रवाल, डॉ. पाराशर व डॉ. बालकृष्णन यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांची भेट घेतली. तिथे प्रदूषण, लोकसंख्या आदीसह काही समस्या जाणून घेतल्या. (शहर प्रतिनिधी)