दुष्काळाचे ‘काऊंटडाऊन’ सुरू
By admin | Published: July 8, 2015 01:08 AM2015-07-08T01:08:24+5:302015-07-08T01:08:24+5:30
मृग नक्षत्रात धो-धो बरसून गेलेला पाऊस अद्याप परतलाच नाही. झालेल्या पावसाच्या बळावर पेरणी करून बसलेल्या शेतकऱ्यांची चिंता आता क्षणाक्षणाला वाढत आहे.
पिके आॅक्सिजनवर : कृषी विभाग म्हणतो, ४८ तासांत पाऊस हवा
संतोष कुंडकर चंद्रपूर
मृग नक्षत्रात धो-धो बरसून गेलेला पाऊस अद्याप परतलाच नाही. झालेल्या पावसाच्या बळावर पेरणी करून बसलेल्या शेतकऱ्यांची चिंता आता क्षणाक्षणाला वाढत आहे. एकूणच कोरड्या दुष्काळाचे ‘काऊंटडाऊन’ सुरू झाले असून येत्या ४८ तासांमध्ये पाऊस न पडल्यास बिजांकुर मातीच्या गर्भातच करपण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ होईल, अशी भीती कृषी विभागाने वर्तविली आहे. सध्या जिल्ह्यातील पिके आॅक्सीजनवर आहेत.
मृग नक्षत्राच्या प्रारंभानंतर पहिल्याच आठवड्यात जिल्ह्यामध्ये सर्वदूर समाधानकारक पाऊस कोसळला. त्यावरून यंदा पाऊस ‘जमके’ बरसेल, असा अंदाज लावण्यात येत होता. हवामान खातेही त्याला पुष्टी देत होते. मात्र गेल्या १५ दिवसांत पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांपुढे दुष्काळाचे संकट घोंगावत आहे. पावसाअभावी हजारो रुपये खर्च करून केलेली पेरणी मातीमोल होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. ज्यांच्याकडे सिंचनाची सोय नाही, असे शेतकरी आपली पिके जगविण्यासाठी जीवाचे रान करीत आहेत.
पिकांच्या वाढीवर परिणाम
सध्या पिकांना पाण्याची गरज आहे. मात्र पाऊसच नसल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून त्यामुळे उत्पादनातही घट होणार आहे. त्यामुळे बँका आणि सावकारांकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या काळजाची धडधड वाढली आहे.
७० टक्के पेरण्या आटोपल्या
चंद्रपूर जिल्ह्यात धान हे मुख्य पीक असले तरी यंदा जिल्ह्यात कपाशीच्या पेऱ्यातही मोठी वाढ झाली आहे. सोयाबीनच्या क्षेत्रात मात्र घट झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात आठ हजार ७८४ हेक्टरवर धान, ३५ हजार हेक्टरवर सोयाबिन व एक लाख एक हजार हेक्टरवर कापसाची पेरणी आटोपली आहे. उर्वरित पेरण्या मात्र पावसाअभावी खोळंबल्या आहेत. पावसाने उघाड दिल्याने आंतरमशातीची कामेही अखेरच्या टप्प्यात आली आहेत. बळीराजा चातकासारखी पावसाची प्रतीक्षा करीत असला तरी पावसाची कोणतीच चिन्हे दिसत नाही.
हवामान खात्याचा
अंदाजही हवेतच विरला
रविवारी हवामान खात्याने ४८ तासांत पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र तो अंदाजही हवेतच विरला आहे. ज्यांच्या शेताजवळून नाला वाहत आहे, ते शेतकरी मोटारपंपाद्वारे शेतात सिंचन करून पिकांना जगविण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र कोरडवाहू शेतकरी पावसाअभावी काकुळतीला आला आहे.
सध्या पिकांची अवस्था लक्षात घेता पावसाची नितांत गरज आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाची लक्षणे दिसत आहेत. त्यामुळे येत्या दोन दिवसांत पाऊस येण्याची अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही.
-डॉ.ए.आर.हसनाबादे
जिल्हा अधीक्षक,
कृषी अधिकारी चंद्रपूर
पाऊस न आल्याने धानाचे पऱ्हे कोमेजत असून सोयाबीनची रोपेही माना टाकत आहेत. दोन दिवसाच्या ढगाळ वातावरणाने कापसाची अवस्था सध्या तरी ठिक आहे. मात्र आता पावसाची नितांत गरज आहे. सुरूवातीला झालेल्या पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या खऱ्या, परंतु नंतर पावसाने चांगलीच दडी मारली. पाऊस आला नाही तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.
- मधुकर भलमे,
शेतकरी, चारगाव (बु.)