कोळसा खाणींच्या पाण्यात बुडून कंत्राटी कामगाराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:29 AM2021-04-04T04:29:30+5:302021-04-04T04:29:30+5:30
सास्ती : कोळसा खाणीत काम करीत असताना खाणीतील पाण्यात बुडून एका कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी ४ ...
सास्ती : कोळसा खाणीत काम करीत असताना खाणीतील पाण्यात बुडून एका कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी ४ वा. सुमारास राजुरा तालुक्यातील पोवनी २ येथे उघडकीस आली. विशाल गणपत हंसकर (२५) रा. वरोडा असे मृत कामगाराचे नाव आहे.
विशाल एका कंत्राटदाराकडे पोवनी २ कोळसा खाणीत पंपावर कंत्राटी कामगार म्हणून काम करीत होता. शनिवारी विशाल, साखरी येथील श्रीकांत बेसुरवार, बाबापूर येथील आशिष मुके हे कामगार खाणीतील मोटार पंपावर काम करीत होते. येथील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने कामगार पाण्यात कोसळले. यावेळी दोघांना पाण्यातून बाहेर काढण्यास यश आले. तर विशालचा बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे वेकोलि खाणीतील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मृतकाच्या परिवाराला नुकसान भरपाई देण्यात यावी, या मागणीसाठी वेकोलि परिसरात मृतदेह ठेवून नुकसान भरपाईची मागणी केली. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.