१२ दिवसांपासून कंत्राटी कामगारांचे आंदोलन सुरुच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 11:11 PM2018-09-03T23:11:40+5:302018-09-03T23:11:58+5:30
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील शेकडो कंत्राटी कामगार व कर्मचाऱ्यांचे मागील चार महिन्यांपासून वेतन थकित आहे. त्यामुळे थकित वेतनाच्या मागणीसाठी प्रहार संघटनेच्या नेतृत्वात कंत्राटी कामगारांचे कामबंद आंदोलन मागील १२ दिवसांपासून सुरु आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील शेकडो कंत्राटी कामगार व कर्मचाऱ्यांचे मागील चार महिन्यांपासून वेतन थकित आहे. त्यामुळे थकित वेतनाच्या मागणीसाठी प्रहार संघटनेच्या नेतृत्वात कंत्राटी कामगारांचे कामबंद आंदोलन मागील १२ दिवसांपासून सुरु आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात जवळपास साडेचारशे कंत्राटी कामगार कार्यरत आहेत. मात्र या कामगारांचे मागील चार महिन्यांपासूनचे वेतन थकित आहे. त्यामुळे कामगारांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे थकित वेतनाच्या मागणीसाठी प्रहार संघटनेचे नगरसेवक पप्पू देशमुख यांनी सातत्याने पाठपुरावा केला. याबाबत त्यांनी मागील महिन्यात पत्र देऊन थकित वेतन तातडीने देण्याची मागणी केली होती. त्यानंतर कामगारातर्फे विनावेतन एक तास अधिक काम करून ‘काम दान’ आंदोलन केले. त्यामुळे थकित वेतनासाठी कंत्राटी कामगारांना २३ आॅगस्टपासून आंदोलन सुरु केले. मात्र त्यांची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे प्रहार संघटनेच्या वतीने गांधी चौकातून कंत्राटी कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर झाडू मोर्चा काढला. यांची दखल घेत कंत्राटदाराकडे ८० लाख रुपये वळते करण्यात आले. मात्र अद्यापही वेतन देण्यात आले नाही. शासनाच्या नियमानुसार प्रत्येक महिन्यांच्या सात तारखेला वेतन देण्याचा नियम आहे. मात्र शासकीय कर्मचारी वगळता कंत्राटी कामगारांचे वेतन प्रलंबित ठेवण्यात येते. त्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.