अतिक्रमण हटावमध्ये दुजाभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 12:37 AM2017-11-26T00:37:34+5:302017-11-26T00:37:54+5:30
शहरात अनेक दिवसांपासून सिंमेट काँक्रीट रोडचे बांधकाम सुरू होते व आता नालीचे बांधकाम सुरू आहे. मात्र ते करीत असताना अंदाजपत्रकानुसार काम व्हायला पाहिजे.
ऑनलाईन लोकमत
पोंभूर्णा : शहरात अनेक दिवसांपासून सिंमेट काँक्रीट रोडचे बांधकाम सुरू होते व आता नालीचे बांधकाम सुरू आहे. मात्र ते करीत असताना अंदाजपत्रकानुसार काम व्हायला पाहिजे. परंतु नियम बाजूला सारून व्यापारीवर्गांची घरे व न.प.ची अतिक्रमणात असलेली चाळ हेतूपुरस्सर वाचविण्यात आली. दुसरीकडे सामान्य नागरिकांची घरे तोडण्यात आल्याने नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
काही दिवसांपूर्वी महामार्गाच्या सिमेंट काँक्रीट रोडचे व नालीचे बांधकाम अंदाजपत्रकानुसार दोन्ही बाजू १२.५ मीटरप्रमाणे करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना व विरोधी पक्षाने केली होती. सदर कामामध्ये न.प.चे गाळे व खासगी व्यापारी व नागरिकांच्या मालकीचे दुकान गाळे हे रस्त्यावर येत असल्याने विकासकामात मोठी अडचण निर्माण होत होती. ज्या ठिकाणी खुली जागा आहे, त्या ठिकाणी १२.५ मीटर नियमाप्रमाणे काँक्रीट रोड व नालीचे बांधकाम करण्यात आले.
मात्र ज्या ठिकाणी अतिक्रमणामध्ये न.प.चे गाळे आले व काही व्यापाºयांची दुकाने आली, ते तसेच ठेवण्यात आले. तर आंबेडकर चौकातील याच रस्त्याच्या नाली बांधकामात अनेकांची घरे तोडण्यात आली. काही ठिकाणी खुली जागा पाहून नियमाप्रमाणे काम करायचे आणि काही ठिकाणी अतिक्रमणात आलेली घरे व दुकान गाळे वाचवायचे, हा कुठला नियम आहे, असा सवाल पोंभूर्णावासीय करीत आहे. न्याय द्यायचा असेल तर सर्वांना समान न्याय मिळायला पाहिजे, असेही नागरिकात बोलले जात आहे.
सदर रोड व नाली बांधकामाबाबत तसेच होत असलेल्या अतिक्रमणाबाबत काही दिवसांपूर्वी येथील एका पक्षीय कार्यकर्त्याने लोकप्रतीनिधीकडे आवाज उठविला होता. मात्र सत्ताधाºयांच्या भूमिकेपुढे तो आवाजही बंद पडला आहे. मात्र सदर रोड व नालीचे बांधकाम करीत असताना प्रामाणिक नागरिकांवर अन्याय झाला असून काही खरोखरच अतिक्रमणधारक आहेत, त्यांना सत्ताधाºयांकडून वाचविण्याचा जोरदार प्रयत्न करण्यात आला आहे.