संवाद कौशल्यातून मिळतील रोजगाराच्या वाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 12:18 AM2017-10-25T00:18:52+5:302017-10-25T00:19:02+5:30
स्थानिक संवादातून स्वयंरोजगाराच्या अनेक वाटा मिळविता येतात, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. एम. एम. वानखेडे यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : स्थानिक संवादातून स्वयंरोजगाराच्या अनेक वाटा मिळविता येतात, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. एम. एम. वानखेडे यांनी व्यक्त केले. तुकूम येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वाणिज्य विभागातर्फे आयोजित व्यक्तिमत्त्व आणि कौशल्य विकास या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते.
प्रमुख पाहुणे प्रा.डॉ. राहुल खराबे, हेमंत सामंत, उपप्राचार्य डॉ.एस.बी. मोहितकर, डॉ.प्रवीण तेलखेडे उपस्थित होते. प्रा.डॉ.राहुल खराबे म्हणाले, व्यक्तिमत्त्व विकास म्हणजे संवाद कौशल्याचा विकास आणि रोजगारभिमुख आवश्यक गुणांचा विकास म्हणजे कौशल्य विकास होय. प्रमुख मार्गदर्शक हेमंत सामंत यांनी विविध व्यक्तिमत्त्वाचे दाखले देत, व्यक्तिमत्व आणि कौशल्य विकास ही संकल्पना स्पष्ट करताना, विद्यार्थ्यांनी बाह्य देखाव्यापेक्षा अंगभूत गुणांचा विकास करीत गेल्यास व्यक्तित्त्व बहरून येईल. शिवाय कौशल्यात वाढ होऊन जीवनाच्या निरनिराळ्या क्षेत्रात फार मोठी प्रगती साधता येते, मत व्यक्त केले. प्राचार्य डॉ.एग.एम. वानखेडे यांनी विपणन, बँकिंग, विमा व व्यवस्थापन इत्यादी क्षेत्रात रोजगाराच्या अफाट संधी निर्माण होत आहेत. या संधीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी अंगभूत कौशल्य वाढविण्याची अत्यत आवश्यकता आहे. कौशल्य विकासावर भर दिला तर आपोआपच व्यक्तिमत्त्व विकसीत होते, असेही त्यांनी नमूद केले.
प्रास्ताविक डॉ.एस.बी. मोहितकर, संचालन डॉ.रविंद्र मुरमाडे यांनी केले. आभार डॉ.व्ही.व्ही. लाडे यांनी मानले. यशस्वी करण्यासाठी डॉ. व्ही.व्ही. लाडे, प्रा.डी.के. गोवारदिपे, प्रा. जी.के. जीभकाटे, डॉ. मुरमाडे, आदींनी सहकार्य केले.