साथरोग नियंत्रणासाठी जिल्ह्यात ७३ कक्ष सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 11:51 PM2019-07-09T23:51:41+5:302019-07-09T23:53:35+5:30
जिल्ह्यात साथरोगांचा उद्रेक होऊ नये, यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून खबरदारी घेतल्या जात आहे. सर्व तालुक्यात ३१ ठिकाणी साथरोग नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात साथरोगांचा उद्रेक होऊ नये, यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून खबरदारी घेतल्या जात आहे. सर्व तालुक्यात ३१ ठिकाणी साथरोग नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले. विविध आजारांना प्रतिबंध घालण्यासाठी १९ प्रकारचा औषधसाठा या कक्षात उपलब्ध करून देण्यात आला, अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली.
दूषित पाण्यामुळे सुमारे ८० टक्के आजार उद्भवतात. डेंग्यू व अन्य आजारांचा फैलाव होण्याची भिती जुलै महिन्यातच सर्वाधिक असते. त्यामुळे शिवाय डेंग्यू प्रतिरोध महिना म्हणून जुलै महिन्यातच विविध जनजागृती कार्यक्रम घेतल्या जातात. पावसाळ्यात जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये, याकरिता जिल्हा परिषद जिल्हा आरोग्य विभागातर्फे साथरोग नियंत्रण कार्यक्रमही सुरू करण्यात येणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांना यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. आजाराची लक्षणे दिल्यास आरोग्य पथक तात्काळ संबंधित गावात पाठविण्यात येणार आहे. ५८ प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रूग्णालय १३, जिल्हा सामान्य रूग्णालय व जिल्हा परिषद आरोग्य विभागात साथरोग नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले. पावसाळा सुरू असल्यामुळे जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले. कर्तव्य बजावताना हलगर्जीपणा करू नये, अशा सूचनाही जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांनी दिल्या आहेत.
असा असतो एडीस एजिप्टाय डास
डेंग्यू हा आजार विशिष्ट विषाणूंमुळे होतो. या रोगाचा प्रसार एडिस एजिप्टा नावाच्या मादी डासामार्फत होतो. डासांच्या पायावर पांढरे चट्टे असल्याने त्याला टायगर मॉस्क्यूटो म्हणतात. अंडी, अळी, कोष व पूर्ण डास डास अशा डासांच्या चार अवस्था आहेत. आयुष्य तीन आठवडे असते. मादी डासाला अंडी घालण्यासाठी रक्त आवश्यक असते. एडीस एजिप्टाय डास हा एकावेळी ५०० मीटर अंतर उडतो. डासाची उत्पत्ती साचलेले किंवा साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते. हा डास घरातील अंधाºया व अडगळीच्या ठिकाणी बसतो. तो दिवसा चावा घेतो.
डेंग्यू आजाराची लक्षणे
तीव्र ताप येणे, डोकेदुखी, अंगदुखी, उलटी,मळमळ, अशक्तपणा, अंगावर पुरळ, डोळ्यांच्या आतील बाजूस वेदना अशी लक्षणे आढळून आल्यास रुग्णाला तात्काळ जवळील आरोग्य केंद्र, उपकेंद्र व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे. हा विषाणूजन्य आजार असल्याने निश्चित उपचार नाही. परंतु लक्षणानुसार उपचार केले जातात. विशेष म्हणजे डेंग्यू ताप आलेल्या रुग्णांनी अॅस्प्रीन ब्रुफेनसारखी औषधे घेऊ नयेत.
एडीस एजिप्टाय या डासाची उत्पती रोखण्यासाठी पाणी साठविण्याची भांडी हौद, टाकीला झाकण बसवावे. सर्व भांडी आठवड्यातून किमान एकदा रिकामे करावी. स्वच्छ व कोरडी केल्यानंतरच वापरावे. प्रत्येक कुटुंंबाने आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळावा.