आझाद बागेची वादग्रस्त निविदा अखेर रद्द
By admin | Published: October 25, 2015 12:48 AM2015-10-25T00:48:39+5:302015-10-25T00:48:39+5:30
शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या आझाद बागेच्या नूतनीकरणाचे कंत्राट गतवर्षभरापासून गाजत असताना
स्थायी समितीच्या सभेत निर्णय : फेरनिविदा मागविण्यासाठी हालचाली सुरू
चंद्रपूर : शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या आझाद बागेच्या नूतनीकरणाचे कंत्राट गतवर्षभरापासून गाजत असताना अखेर या कंत्राटाच्या निविदाच रद्द करण्याचा निर्णय शुक्रवारी पार पडलेल्या चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत घेण्यात आला.
गत काही दिवसापासून गाजत असलेल्या मौलाना अब्दुल कलाम आझाद बगिचाला विकसित करण्याच्या कामाच्या निविदेला काही दिवसांपूर्वी मनपा सदस्य असलेल्या सहा सदस्यीय समितीने स्थगिती दिली होती. देखभाल दुरुस्ती ही बगीचा विकसित केल्यानंतरची बाब असल्याने त्याची वेगळी निविदा काढण्यात यावी, असे मत समितीने व्यक्त केले होते. मौलाना अब्दुल कलाम आझाद बगिचा विकसित करण्याच्या कामासा प्राप्त झालेल्या निविदेवर विश्लेषण करुन अहवाल सादर करण्यासाठी नगरसेवक दुर्गेश कोडाम यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यांची समिती तयार करण्यात आली. यात दुर्गेश कोडाम, ऐस्तेर शिरवार, राजेश अडूर, राजकुमार उके, नंदू नागरकर व प्रवीण पडवेकर यांचा समावेश होता. समितीने स्थायी समिती सभापती यांना सादर केलेल्या अहवालात नमूद केले आहे की, आझाद बगिचा विकसित करणे व देखभाल करण्याच्या निविदेकरिता आलेल्या आक्षेपावर समितीच्या निर्णयानुसार व कार्यालयातर्फे पुरविण्यात आलेल्या कागदपत्रानुसार असे लक्षात येते की, कार्यालयातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या निविदेत वृत्तपत्रामध्ये प्रकाशित मजकुरात देखभालीबाबतचा मुद्दा प्रकाशित झाला नसल्याचे दिसून येते. त्यामुळे नगरसेवक नंदू नागरकर यांनी घेतलेल्या आक्षेपाला अमान्य करता येत नाही.
समितीद्वारे सदर प्रकरणी सविस्तर तपासणी करण्यात आली आणि पारदर्शकता ठेवण्याच्या दृष्टीने वृत्तपत्रात प्रकाशित मजकुरामध्ये देखभाल शब्द घेऊन फेरनिविदा प्रकाशित करावी व इ निविदामध्ये बागेचा सविस्तर क्षेत्रफळ दर्शविणारा तक्ता जोडण्यात यावा, असेसुद्धा ठरविण्यात आले. देखभाल दुरुस्ती ही बगिचा विकसित केल्यानंतरची बाब असल्याने त्याची वेगळी निविदा काढण्यात यावी, असे ठरले. (शहर प्रतिनिधी)