पाणी व कंत्राटाच्या मुदतवाढीवरून वादंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 09:59 PM2018-09-29T21:59:45+5:302018-09-29T22:00:29+5:30

इरई धरणात पाणी असतानाही शहरात अनियमित केलेला पाणी पुरवठा व नाले सफाईच्या कंत्राटदाराला सरसकट सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याच्या मुद्यावरून मनपाच्या आमसभेत चांगलीच खडाजंगी झाली. बाचाबाची एवढी वाढली की एक वेळ ही आमसभा आहे की युध्दाचे रणांगण हेच कळेनासे झाले होते.

The controversy over water and contract extension | पाणी व कंत्राटाच्या मुदतवाढीवरून वादंग

पाणी व कंत्राटाच्या मुदतवाढीवरून वादंग

googlenewsNext
ठळक मुद्देमनपाची आमसभा वादळी : नागरकर व देशमुख यांच्यात धक्काबुक्की

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : इरई धरणात पाणी असतानाही शहरात अनियमित केलेला पाणी पुरवठा व नाले सफाईच्या कंत्राटदाराला सरसकट सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याच्या मुद्यावरून मनपाच्या आमसभेत चांगलीच खडाजंगी झाली. बाचाबाची एवढी वाढली की एक वेळ ही आमसभा आहे की युध्दाचे रणांगण हेच कळेनासे झाले होते. दरम्यान, काँग्रेसचे नंदू नागरकर आणि सभागृहनेते वसंत देशमुख यांच्यात जोरदार धक्काबुक्की झाली. यात आणखी काही नगरसेवक गुंतल्याने रणक्रंदन माजले. विविध मुद्यांवरून उठलेले वादंग शांत होत नसल्याने अखेर काँग्रेसच्या व इतर नगरसेवकांनी सभात्याग करून आपला निषेध नोंदविला.
पावसाळा संपायला आला तरी उन्हाळ्यापासून कपात केलेला पाणी पुरवठा पूर्ववत नियमित केला नाही. जाणीवपूर्वक चंद्रपूरकरांना पाण्यासाठी वंचित ठेवले जात आहे. मनपाच्या या धोरणाचा निषेध करण्यासाठी काँग्रेस नगरसेवकांनी मडके घेऊनच सभागृहात प्रवेश केला. त्यामुळे आमसभा सुरू होताच वादळ उठले. पावसाळा सुरू झाल्यानंतर तो संपेपर्यंत पाणी पुरवठा नियमित का केला नाही, असे विचारत नगरसेवक नंदू नागरकर, नगरसेविका सुनिता लोढिया व इतर नगरसेवकांनी सभागृहातच मडके फोडले. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. सत्ताधारी पक्षातील व विरोधी पक्षातील नगरसेवकांमध्ये खडाजंगी सुरू झाली.
नाले सफाईच्या कंत्राटाची मुदत संपली आहे. त्यानंतर परत निविदा काढण्याऐवजी मनपाच्या स्थायी समितीत सदर कंत्राटाला सरसकट सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. याबाबत नगरसेवक नंदू नागरकर यांनी महापौर व स्थायी समिती सभापती यांना जाब विचारला. स्थायी समितीची सभा दर आठवड्यात होते. त्यामुळे आठवड्याची किंवा एक महिन्याची मुदतवाढ द्यायला हवी होती. मात्र सरसकट सहा महिन्यांची मुदतवाढ कोणत्या निकषावर देण्यात आली, असे नागरकर यांनी म्हटले. त्यानंतर सभागृह नेता वसंत देशमुख आणि नंदू नागरकर यांच्यामध्ये खडाजंगी सुरू झाली. दोघेही एकमेकांवर धाऊन गेले. दरम्यान नगरसेवक संदीप आवारी, सुरेश पचारे, दीपक जयस्वाल व काही नगरसेवकांनी मधे येऊन दोघांनाही सावरले. तरीही यात चांगलीच धक्काबुक्की झाली. दरम्यान, यावेळी नगरसेवक नंदू नागरकर, सुनिता लोढिया, दीपक जयस्वाल, अशोक नागापुरे, प्रहारचे पप्पु देशमुख यांनी सभागृह नेता वसंत देशमुख हे मद्य प्राशन करून असल्याचा आरोप करीत त्यांची वैद्यकीय तपासणी करण्याची मागणी केली. हा गोंधळ जवळपास १५-२० मिनिटे सुरूच होता. त्यामुळे महापौर अंजली घोटेकर यांनी दहा मिनिटांसाठी सभा तहकूब केली व त्या सभागृहाबाहेर निघून गेल्या. काही वेळानंतर सभा पूर्ववत सुरू झाली. त्यानंतर इतर विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी जेल मार्गाचे शहीद बाबुराव शेडमाके मार्ग असे नामकरण करण्याच्या विषयाला मंजुरी देण्यात आली. यासोबतच डेंग्यूवर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना केल्या जातील, असे महापौर यांनी सांगितले.

‘पाणी द्या महापौर’ आंदोलन
आमसभा सुरू असतानाच महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मडके घेऊन ‘पाणी द्या महापौर’ आंदोलन करण्यात आले. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या इरई धरणात मुबलक जलसाठा आहे. धरणाचे दोन दरवाजे काही दिवसांपूर्वी उघडावे लागले. तरीही चंद्रपूरकरांना दररोज पाणी दिले जात नाही. हा चंद्रपूरकरांवर अन्याय आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी बँड पथकही आणण्यात आले होते. यावेळी कमिटीचे अध्यक्ष नंदू नागरकर, सुनिता लोढिया, अमजद खान व काँग्रेस नगरससेवक उपस्थित होते. यावेळी महानगरपालिकेच्या धोरणाचा निषेध करण्यात आला व निदर्शने देण्यात आली.

गांधी जयंतीपासून पाणी
सभा सुरू झाल्यानंतर काही वेळातच महापौर अंजली घोटेकर यांनी २ आॅक्टोबर गांधी जयंतीपासून चंद्रपुरात दररोज पाणी पुरवठा केला जाईल, अशी माहिती दिली. या संदर्भात पाणी पुरवठा करणाºया उज्ज्वल कंस्ट्रक्शन कंपनीला आदेश देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: The controversy over water and contract extension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.