अतिवृष्टीत घर कोसळलेल्या सुमनबाईचा निवाऱ्यासाठी संघर्ष
By admin | Published: January 24, 2017 12:43 AM2017-01-24T00:43:30+5:302017-01-24T00:43:30+5:30
पोंभुर्णा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या देवाडा खुर्द येथे मागील दोन वर्षापूर्वी झालेल्या संततधार पावसामुळे वॉर्ड क्रमांक दोनमध्ये वास्तव्यास असलेल्या ...
शासनाकडून थट्टा : केव्हा मिळणार घरकुलाचा लाभ?
पोंभुर्णा : पोंभुर्णा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या देवाडा खुर्द येथे मागील दोन वर्षापूर्वी झालेल्या संततधार पावसामुळे वॉर्ड क्रमांक दोनमध्ये वास्तव्यास असलेल्या अल्पभूधारक विधवा महिला सुमनबाई गद्देकार हिचे संपूर्ण घर कोसळले. त्यामुळे रस्त्यावर आलेल्या सुमनबार्इंना शेजाऱ्यांनी आश्रय दिला. शासनाने मात्र तिला तुटपुंजी मदत देऊन तिची अवहेलना केली.
मागील दोन वर्षापूर्वी संततधार पावसाने सुमनबार्इंचे अख्ये घर भुईसपाट झाले. त्यामुळे त्यांच्या वास्तव्याचा प्रश्न निर्माण झाला, तेव्हा घराशेजारील पुरुषोत्तम घुग्घुस्कार नामक व्यक्तीने आपल्या घरी तिला आश्रय दिला. त्यांची हलाखीची स्थिती बघून येथील सामाजिक कार्यकर्ते निलकंठ नैताम व जि.प. सदस्या संगीता घोंगडे यांनी तत्कालीन संवर्ग विकास अधिकारी चापडे व तहसीलदार राजेश सरवदे यांची भेट घेऊन या आपादग्रस्त महिलेची कैफीयत मांडली आणि संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाठवून चौकशी केली व १५ हजार रुपयांची मदत मिळवून दिली. इतरांच्या घरी किती दिवस आश्रय घ्यावा लागेल, याचे शल्य सुमनबाईला बोचत होते. परंतु स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने व गावकऱ्यांच्या सहकार्यातून छोटीशी का होईना झोपडी बांधून तिची निवाऱ्याची व्यवस्था करुन देण्यात आली. सदर महिला ही दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील व्यक्ती असून आज ती ६५ वर्ष वयाची आहे. सुमनबार्इंचे पती सिताराम हे दहा वर्षापूर्वीच वारले. त्यामुळे त्या एकट्याच आहे. त्यांना अपत्य नाही. झोपडीत शौचालयाची सोय नाही. केवळ निराधार योजनेच्या ६०० रुपयांवर ती कशीबशी हलाखीचे जीवन जगत आहे.
निराधार व गरीब नागरिकांना स्वत:चे घर मिळावे, यासाठी शासनाने घरकुल योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येकाला मजबूत घर मिळेल, हा जरी शासनाचा उद्देश असला तरी मात्र या योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे सुमनबाईसारखे अनेक वृद्ध आजही हक्काच्या निवाऱ्यापासून वंचित असल्याचे वास्तव बघायला मिळत आहे. ६५ वर्ष ओलांडलेल्या सुमनबार्इंना त्यांच्या म्हातारपणात तरी घरकुल योजना मिळणार काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. (तालुका प्रतिनिधी)
सदर महिलेने पोंभुर्णा येथील तत्कालीन तहसीलदार सरवदे यांची भेट घेतली असता घरकुल देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु ते आज या ठिकाणी नसल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी सदर विधवा महिलेला घरकुलाचा लाभ मिळवून द्यावा, अशी नागरिकांकडून मागणी केली जात आहे.