काॅन्व्हेंटच्या शिक्षकांना लॉकडाऊनची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:30 AM2021-05-27T04:30:17+5:302021-05-27T04:30:17+5:30
चंद्रपूर : मागील वर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा कोरोनामुळे लाॅकडाऊन करण्यात आले. कोरोनामुळे खासगीसह सर्व शासकीय शाळांना सुट्या जाहीर करण्यात आल्या. मागील ...
चंद्रपूर : मागील वर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा कोरोनामुळे लाॅकडाऊन करण्यात आले. कोरोनामुळे खासगीसह सर्व शासकीय शाळांना सुट्या जाहीर करण्यात आल्या. मागील वर्षभर कसातरी ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू करून विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम केले. मात्र शेवटी परीक्षा न घेताच विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्यात आला. मात्र यावर्षीही कोरोना संकट जाईल, अशी शक्यता नसल्याने खासगी शाळांतील शिक्षकांची चिंता वाढली असून जगायचे कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
जिल्ह्यातील कानाकोपऱ्यामध्ये मोठ्या संख्येने विविध संस्थांच्या इंग्रजी खासगी शाळा आहे. या शाळांमध्ये मोठ्या संख्येने कंत्राटी स्वरुपात शिक्षक कामाला आहे तर काही शाळा, महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावरही काही शिक्षक कामाला आहे. मात्र मागील वर्षभरापासून त्यांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. काही संस्थांनी वेतन दिले. मात्र काहींना अत्यल्प वेतनावरच समाधान मानावे लागले तर काही संस्थांनी हात वर करून आर्थिक परिस्थितीचा पाढाच त्यांच्यासमोर वाचला. त्यामुळे वेतन मागण्याचा प्रश्न उरला नाही. यात मात्र खासगी शाळेतील शिक्षकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यातच पुढील शैक्षणिक वर्षही कोरोनाच्या सावटात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पालक खासगी शाळांमध्ये पैसे भरण्याच्या भानगडीत पडणार नसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. परिणामी खासगी शाळांतील शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न भविष्यात अधिक कठिण होईल, अशी शक्यता काही शिक्षकांना व्यक्त केली आहे.
दरवर्षी मार्च, एप्रिल महिना अखेरपर्यंत कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना मानधन मिळत होते. मात्र यावर्षी वर्षभरापासून सुटीच असल्याने अनेक कर्मचाऱ्यांचा पगार मिळालेच नसल्याची माहिती मिळाली आहे.
बाॅक्स
पुढील महिन्यात निकाल
काही खासगी शाळांनी ऑनलाईन अभ्यासक्रमासोबतच ऑनलाईन परीक्षासुद्धा घेतली. दरम्यान, निकाल जाहीर करून तो विद्यार्थ्यांच्या हातातही देण्याच्या तयारीत लागल्या आहे. विशेष म्हणजे, काही शाळांनी पालकांना शाळेत बोलाविण्याचे वेळापत्रकही जाहीर करून टाकले असून जाहीर करण्यात आलेल्या तारखेला पालकांना
शाळेत जाऊन आपल्या पाल्यांचा निकाल घ्यायचा आहे. विशेष म्हणजे, या निकालासोबत वर्षभराची फी भरावी लागणार असल्याची शक्यता आहे.