परिपाठात ‘हिरो आॅफ द डे’ची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 11:52 PM2017-09-07T23:52:28+5:302017-09-07T23:52:44+5:30
बालवयातच विद्यार्थ्यांच्या अंगी शिस्त व सुसंस्कार लावणे आवश्यक असते. शिस्त व सुसंस्काराची अंगवळणी विद्यार्थ्यांमध्ये लावता आली तर चिरकाल टिकते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंडपिपरी : बालवयातच विद्यार्थ्यांच्या अंगी शिस्त व सुसंस्कार लावणे आवश्यक असते. शिस्त व सुसंस्काराची अंगवळणी विद्यार्थ्यांमध्ये लावता आली तर चिरकाल टिकते. शालेय जीवन हे सुसंस्काराचे व शिस्तीचे पाया रचणारे स्थान आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांमध्ये वैयक्तीक स्वच्छतेची संकल्पना रुजावी, स्वच्छतेचे महत्व समजून वैयक्तीक आरोग्य सुधारणेसाठी गणवेश स्वच्छ ठेवणे, नियमित नखे कापणे, आंघोळ करणे, केसांची निगा राखणे यासारख्या चांगल्या आरोग्यदायी सवयी अंगवळणी लावण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद मुलींची शाळा गोंडपिपरी येथे दररोज परिपाठानंतर ‘हिरो आॅफ द डे’ची निवड केली जात आहे.
या उपक्रमांतर्गत प्रत्येक वर्गाचा वर्ग शिक्षक त्या-त्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या गणवेशाची स्वच्छता, नखे, बुट निटनेटका आहे का, याची पाहणी करुन प्रत्येक वर्गातून एक- एक विद्यार्थ्यांची निवड करुन त्यांना बॅच लावतात. दिवसभर बॅच त्यांच्याकडेच असते. यावेळेस ज्या विद्यार्थ्यांची निवड होते, त्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. उर्वरीत विद्यार्थी सुद्धा मला कधी बॅच मिळणार, या आशेने स्वच्छ व निटनेटका राहण्याचा प्रयत्न करतात. बॅच मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरसीची शर्यत असते.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यदायी चांगल्या सवयी रुजण्यात मदत होत आहे. शाळेत उपस्थितीचे प्रमाण दिवसागणीक वाढत आहे. विद्यार्थ्यांच्या वर्तनात व वागणुकीत आमुलाग्र बदल होताना दिसत आहे. त्यामुळे शिक्षकांसोबत पालकवर्ग सुद्धा समाधान व्यक्त करीत आहे. या उपक्रमांचा सर्व स्तरातून कौतूक होत आहे. उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी मुख्याध्यापक हिराजी कन्नाके, उपक्रम प्रमुख मुर्लीधर सरकार, निलकंठ शेंडे, आनंदराव मेश्राम, धर्मपाल निमगडे, जिजा कुळमेथे, कल्पना कुळसंगे, अर्चना जिडकुंटावार, दीपा राखावार, प्रेमदास निकुरे, शोभा बट्टे, कत्रोजवार परिश्रम घेत आहे.