चंद्रपुरात पार पडले राष्ट्रीय मुस्लीम मोर्चाचे अधिवेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 10:09 PM2017-10-08T22:09:26+5:302017-10-08T22:09:36+5:30
बॅरिस्टर खोब्रागडे सभागृह चंद्रपूर येथे राष्ट्रीय मुस्लीम मोर्चा तथा मायनॉरिटी ग्रुप, चंद्रपूर द्वारा मुस्लिम समाज संमेलन (जलसा) चे आयोजन करण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : बॅरिस्टर खोब्रागडे सभागृह चंद्रपूर येथे राष्ट्रीय मुस्लीम मोर्चा तथा मायनॉरिटी ग्रुप, चंद्रपूर द्वारा मुस्लिम समाज संमेलन (जलसा) चे आयोजन करण्यात आले होते. विलास खरात यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या संमेलनाला बहुसंख्य नागरिकांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे उद्घाटन जाबीर रजा यांच्या हस्ते पार पडले. देश प्रेम हे एक ईबादत आहे. जात-पात भेदभावाला आपण बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले. विविध संगठन व समाजाचे प्रतिनिधी म्हणून फादर सुनीलकुमार फ्रांसिस यांनी देशातील परिस्थितीचे मार्मीकता व्यक्त केली. प्रमुख अतिथी अनवर भाई यांनी सर्व समाज बांधवांना एक होण्याचे आवाहन केले. शाहीन खान शफी खान यांनी सध्याच्या परिस्थितीवर मत व्यक्त केले. लिंगायत समाजाच्या प्रतिनिधी म्हणून आलेल्या एकता श्रीकांत पिट्टूलवार यांनी कार्यक्रमाची प्रशंसा करून हे बंधुभाव संगठन आहे, असे सांगितले. सर्वांनी एकता कायम केली पाहिजे, असे ते म्हणाले.
बौद्ध महासभाचे प्रा.कोसे यांनी आपले संविधान कायम ठेवण्याची गरज आहे. टिपू सुलतान फाऊंडेशनचे अमजद यांनी टीपू सुलतान यांच्या इतिहासावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विलास खरात यांनी, अल्पसंख्यांकाचे प्रश्न वाढत चालले आहेत. आम्हाला पुन्हा आमचे संवैधानिक अधिकार परत मिळवायचे आहेत. मुस्लिम समाजाने संवैधानिक अधिकार समजले पाहिजे, निष्पाप मुसलमान युवकांना आतंकवादी घोषित करून त्यांना २०-२५ वर्षे तुरुंगात डांबण्यात येते व पुराव्याअभावी त्यांची सुटका करतात. अशाप्रकारे मुस्लीम समाजाचे मनोबल खच्चीकरण करण्याचे षडयंत्र सुरू असून ही समस्या सुटली पाहिजे असे म्हणाले. यावेळी डॉ.कोचे, डॉ. राकेश गावतुरे उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. सिराज खान, संचालन राजू ढेंगळे तर आभार डॉ. आशिष यांनी मानले. यशस्वीतेसाठी अनेकांनी सहकार्य केले.