पाणी व्यवसायामुळे माठांवर संक्रांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 10:26 PM2019-03-22T22:26:00+5:302019-03-22T22:26:16+5:30
गेल्या चार ते पाच वर्षांत थंड पाण्याचा धंदा मोठ्या प्रमाणावर फोफावला आहे. खेडोपाडी आणि गल्लीबोळातही थंड पाण्याचे उद्योग सुुरू झाले आहे. याचा परिणाम परंपरागत कुंभार व्यवसायावर होत असून उन्हाळ्यात गरिबांचा फ्रीज म्हणून ओळख असलेल्या माठांवर आता हळूहळू संक्रात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : गेल्या चार ते पाच वर्षांत थंड पाण्याचा धंदा मोठ्या प्रमाणावर फोफावला आहे. खेडोपाडी आणि गल्लीबोळातही थंड पाण्याचे उद्योग सुुरू झाले आहे. याचा परिणाम परंपरागत कुंभार व्यवसायावर होत असून उन्हाळ्यात गरिबांचा फ्रीज म्हणून ओळख असलेल्या माठांवर आता हळूहळू संक्रात येत आहे.
पाण्याचा धंदा तसा नवीन नाही. काही दिवसापूर्वी बंद बाटलीमधून पाणी विकले जायचे. या बाटलीबंद पाण्याचा वापर केवळ उच्चभ्रू नागरिकच करायचे. हाच वर्ग घरी पाणी शुद्धीकरणाचे संयंत्र बसवून शुद्ध पाण्याचा वापर करू लागला. मात्र खेड्यापाड्यातील आणि शहरातीलही सर्वसामान्य व मध्यमवर्गीय नागरिक थंड पाण्यासाठी माठाचाच उपयोग करीत असायचे. त्यामुळे खेड्यापाड्यातून आणि शहरातूनही माठाला प्रचंड मागणी होती. पण हल्ली हे दिवस बदलले आहेत. शहरात आणि खेडोपाडी शुद्ध पाण्याचे 'उद्योग' उघडण्यात आल्याने आणि या पाण्याची विक्री कॅनद्वारे होत असल्याने हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर फोफावला आहे. एवढेच नाही, तर या धंद्यात स्पधार्ही मोठी आहे. सुरूवातीला पाण्याचा हा धंदा सुरू झाला तेव्हा २० लीटरच्या एका कॅनची किंमत ४० रुपये होती. नंतर हळूहळू या धंद्यात अनेकांनी प्रवेश केला आणि स्पर्धा सुरू झाली. पाण्याच्या या कॅनचे दर हळूहळू कमी कमी होत गेले. ४० रूपयांवरून हा दर घरपोच ३० रुपये केव्हा झाला हे कळलेच नाही. आता तर कॅन २० रूपयाला मिळत आहे. काही विक्रेते तर १५ रूपयांत देत असल्याची माहिती आहे. परिणामी सर्वसामान्यासह मध्यमवर्गीय लोकही या कॅनद्वारे मिळणाऱ्या पाण्याचा वापर करीत आहे. दरम्यान, उन्हाळ्यात घराघरातून जो माठांचा मोठा प्रमाणावर वापर होत होता. तो आता कमी कमी होत आहे. दीड दोन दिवसांपर्यंत पाणी थंड ठेवणारे कॅन सहज उपलब्ध होत असल्याने लोकांनीही माठ खरेदी करणे कमी केले आहे.
कॅनच्या पाण्यामुळे आमच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. मी पूर्वी उन्हाळ्यात ५०० माठ विकत होते. आता दोनशेही माठ विकत नाही. माझीच नाही, तर आमच्या व्यवसायात असणाऱ्या प्रत्येकाचीच हीच अवस्था आहे.
- वंदना राजू ठाकूर
कुंभार व्यावसायिक, नागभीड