चंद्रपूर जिल्ह्यातील गोजोलीत आढळली वाकाटक घराण्यातील राजमुद्रा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 05:00 AM2020-07-29T05:00:00+5:302020-07-29T13:35:21+5:30
जिल्ह्याच्या गोंडपिपरी तालुक्यातील गोजोली येथील प्रकाश उराडे यांच्याकडे पेटीत ६० ग्रॅम वजनाची गोलाकार आकारातील तांब्याची वस्तू सापडली. अभ्यासाअंती हा तांबा राजा पृथ्वीसेन (द्वितीय) यांची राजमुद्रा असल्याची शक्यता पुणे येथील अमोल बनकर व अशोक सिंह ठाकूर यांनी वर्तविली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : वडिलांच्या निधनानंतर त्यांची पेटी उघडली असता त्यात एक तांब्याची मुद्रा आढळून आली. या वस्तूचा इतिहास समोर आला आणि सारेच अवाक् झाले. ती साधी वस्तू नसून चक्क राजमुद्रा निघाली. वाकाटक घराण्यातील शेवटचा राजा पृथ्वीसेन द्वितीय यांची ती राजमुद्रा होती. पाचव्या शतकातील वाकाटकांची ही राजमुद्रा जिल्हाच्या प्राचीन इतिहासात भर घालणारी ठरणार आहे. या राजमुद्रेवर राजलक्ष्मीचे चित्र अंकित असून ब्राम्ही लिपीत लेख कोरलेला आहे.
जिल्ह्याला प्राचीन इतिहास लाभला आहे. मौर्य, सातवाहन, वाकाटक, परमार, नाग, गोंडराजे व भोसल्यांची येथे सत्ता होती. जिल्ह्याच्या भूगर्भात दडलेला तेजस्वी इतिहास उजेडात येत आहे. गोंडपिपरी तालुक्यातील गोजोली येथील प्रकाश उराडे यांच्याकडे ऐतिहासिक ठेवा पडून होता. मुलगा रणजित उराडे यांने वडीलांच्या खोलीत असलेली जुनी पेटी उघडली. पेटीत ६० ग्रॅम वजनाची गोलाकार आकारातील तांब्याची वस्तू सापडली. ही वस्तू ७ सेमी लांब, ३ सेमी रूंदीची आहे. त्यावर कमलपुष्पावर विराजमान देवीचे चित्र कोरले आहे. देवीच्या उजव्या हातात कमलपुष्प आहे. चित्राखाली ब्राम्ही लिपीत लेख कोरला आहे. ही तांब्याची वस्तू महत्त्वाची वाटल्याने रंजित उराडे याने निलेश झाडे यांची भेट घेतली. निरीक्षण केल्यानंतर चंद्रपूर येथील अभ्यासक अशोक सिंह ठाकूर यांच्याशी संपर्क साधला. अभ्यासाअंती हा तांबा राजा पृथ्वीसेन (द्वितीय) यांची राजमुद्रा असल्याची शक्यता पुणे येथील अमोल बनकर व अशोक सिंह ठाकूर यांनी वर्तविली आहे.
राजा पृथ्वीसेन (द्वितीय)चा इतिहास
प्रकाश उराडे यांनी जतन करून ठेवलेली ती वस्तू वाकाटक राजवंशातील शेवटचा राजा पृथ्वीसेन (द्वितीय) यांची राजमुद्रा आहे. पृथ्वीसेनाचा कालखंड इ.स.४७५-४९५ असा आहे. पृथ्वीसेनचे ताम्रपट बालाघाट, मांढळ, माहूरझरी येथे मिळाले आहेत. नागपूर जिल्ह्यातील नगरधन येथे वाकाटकांची राजधानी होती. पृथ्वीसेन (द्वितीय) यांची राजमुद्रा जिल्ह्यात सापडल्याने चंद्रपूरच्या प्राचीन इतिहास भर पडल्याचे मानले जात आहे.
काय लिहिले राजमुद्रेत?
राजमुद्रेवर सुरूवातीलाच राज्यलक्ष्मीचे चित्र कोरले आहे. अश्याप्रकारचे चित्र गुप्त राजवटीतील सोन्याच्या नाण्यावर अंकित असायचे. त्याखाली ब्राम्ही लिपीत लेख कोरला आहे. या लेखाचे वाचन पुणे येथील इंडॉलाजिस्ट बनकर, इतिहास अभ्यासक ठाकूर यांनी केले. लेखात ‘नरेंद्रसेन याचा पुत्र पृथ्वीसेन यांची ही राजमुद्रा’ असे लिहिले आहे.