नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 11:30 PM2017-12-23T23:30:28+5:302017-12-23T23:30:41+5:30
विनापरवानगी वाळूची वाहतूक करणाºया वाहनांवर कारवाई करताना अडथळा करणाऱ्या वाळूतस्करांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तहसीलदार डॉ. रवींद्र होळी यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरुन ही कारवाई करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : विनापरवानगी वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करताना अडथळा करणाऱ्या वाळूतस्करांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तहसीलदार डॉ. रवींद्र होळी यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरुन ही कारवाई करण्यात आली. गुन्हा दाखल झालेल्या आजी-माजी नगरसेवकांचा समावेश आहे.
तहसीलदार डॉ. रवींद्र होळी यांनी वाळूतस्करांविरुद्ध धडक मोहीम सुरु केली आहे. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी २० डिसेंबरला सायंकाळी ७ वाजता नाका क्रमांक तीन येथे एमएच ३४ ए ४२०९ क्रमांकाचे वाहन अडविले. त्यानंतर अवैध वाहतुकप्रकरणी ट्रॅक्टरमालक देविदास धोंडूजी कोटरंगे यांच्यावर कारवाई सुरु केली. यावेळी ट्रॅक्टर चालक- मालक असोसिएशनचे अध्यक्ष व नगरसेवक राजू डोहे, शरीफ सिद्दीकी, मोहम्मद जावेद शेख यांनी कारवाईत अडथळा निर्माण केल्याची तक्रार तहसीलदारांनी राजुरा पोलीस ठाण्यात दाखल केली.
या तक्रारीवरुन पोलिसांनी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.
जुन्या टीपीवर रेतीची वाहतूक
चंद्रपूर : रेतीची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या १९ वाहनांवर कारवाई करण्यात आली. यातील अनेक वाहनचालकांकडे टीपी नव्हती. काहींकडे जुनी टीपी आढळून आली. ही कारवाई उपविभागीय अधिकारी मनोहर गव्हाण यांच्या नेतृत्वात करण्यात आली. चंद्रपूर उपविभागीय क्षेत्रात रेतीची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी मनोहर गव्हाळ यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यासह विशेष मोहीम राबविली. मागील चार ते पाच दिवसांत सुमारे १९ वाहने जप्त करण्यात आली. जुनोना, बंगाली कॅम्प चौक, जनता कॉलेज चौक, घुग्घुस येथे या कारवाया करण्यात आल्या. ट्रक, हापटन, ट्रॅक्टर या वाहनांना जप्त करुन त्यांच्यावर दंड आकारण्यात आल्याची माहिती आहे.