जिल्ह्यात ३६.२ टक्के लोकांना होऊन गेला कोरोना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:26 AM2020-12-22T04:26:53+5:302020-12-22T04:26:53+5:30
चंद्रपूर : जिल्ह्यात आतापर्यंतची कोरोना बाधितांची संख्या २१ हजार ८६९ झाली आहे. असे असले तरी जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या तब्बल ३६.२ ...
चंद्रपूर : जिल्ह्यात आतापर्यंतची कोरोना बाधितांची संख्या २१ हजार ८६९ झाली आहे. असे असले तरी जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या तब्बल ३६.२ टक्के लोकांना अजाणतेपणी कोरोना होऊन गेला आहे. ही बाब सिरो सर्वेक्षणाच्या अहवालातून समोर आली आहे.
जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट येण्यापूर्वी नेमकी कोरोनाची काय स्थिती आहे, किती लोकांना याचा प्रादुर्भाव झाला याचा अभ्यास करण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले होते. कोरोना झाल्यावरही काही वेळा ताप, सर्दी, खोकला अशा प्रकारची कुठलीही लक्षणे दिसून येत नाही. मात्र, शरीरात एक प्रकारची रोगप्रतिकारक शक्ती तयार होते. या रोगप्रतिकारक शक्तीचीच चाचणी जिल्ह्यात सिरो सर्वेक्षणाच्या माध्यमातून करण्यात आली होती. १७ आॅक्टोबर ते १० नोव्हेंबर यादरम्यान करण्यात आलेल्या सर्वेक्षणात वेगवेगळ्या ठिकाणाहून घेतलेल्या दोन हजार ४०१ नामुन्यांपैकी ८७० जणांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. ही आकडेवारी ३६.२ टक्के इतकी आहे. चंद्रपूर महानगरपालिका हद्दीतून ७२६ नमुने घेण्यात आले. ज्यात २७० नमुने हे पॉझिटिव्ह आढळले. ही आकडेवारी ३७.२ टक्के इतकी आहे. याचाच अर्थ जिल्ह्यात सरासरी ३६ टक्के लोकांमध्ये कोरोनाशी लढण्याची प्रतिकारक क्षमता तयार झाली आहे.
बॉक्स
काय आहे सिरो सर्वेक्षण
सिरो सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश कोरोना आजाराचा समाजातील किती लोकांपर्यंत प्रादुर्भाव झाला आहे, याचा अभ्यास करणे, आरोग्य सेवा बळकट करणे व त्यानुसार उपाययोजनांची अंमलबजावणी करणे हा आहे. या सर्वेक्षणांमध्ये सामान्य लोकसंख्येमधील कमी जोखमीची तसेच जास्त जोखमीची लोकसंख्या, कंटेन्टमेंट झोनमधील लोकसंख्या व अतिजोखमीच्या क्षेत्रातील लोकसंख्या यांचा समावेश करण्यात आला. या सर्व्हेक्षणाअंतर्गत २१ गावे व नऊ कंटेन्टमेट झोनची निवड करण्यात आली. त्यामध्ये दोन हजार ४०० नमुने घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. त्यामध्ये एक हजार ४०० नमुने हे सामान्य लोकसंख्येमधून, ६०० नमुने हे कंटेन्टमेंट झोनमधून व ४०० नमुने हे अतिजोखिम क्षेत्रातील लोकसंख्येमधून घेण्यात आले. सर्वेक्षणामध्ये फ्रन्टलाइन वर्कर ज्यामध्ये शासकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांचा समावेश होता.
बॉक्स
पूर्वतयारी म्हणून केले सर्वेक्षण
एका समूहाला नकळतपणे कोरोना होऊन गेला. अशावेळी जी सामूहिक रोगप्रतिकारक क्षमता तयार होते त्याला हर्ड इम्युनिटी असे म्हणतात. म्हणजेच पुन्हा एकदा कोरोनाच्या संपर्कात येऊनही अशा व्यक्तींना काहीही होत नाही. आरोग्य क्षेत्रातील जाणकारांनुसार कोरोनाच्या दुसºया लाटेची दाट शक्यता आहे. अशावेळी प्रशासनाला सर्व सुविधांनी सज्ज राहण्यासाठी सिरो सर्वेक्षणाची गरज होती. या माध्यमातून निघालेल्या आकडेवारीवरून पुढील उपाययोजना करण्यास मदत होणार आहे.
बॉक्स
काय आहे ''''आयजीजी'''' रोगप्रतिकारक क्षमता
आयजीजी म्हणजेच इम्युनो ग्लोब्युलीन्स. ज्यावेळी शरीरात कोरोनाचा शिरकाव होतो त्यावेळी ही रोगप्रतिकारक शक्ती कामाला लागते. कोरोनाच्या विषाणूसोबत ती दोन हात करत असते. शरीर पूर्णत: निरोगी ठेवण्याचे काम ही रोगप्रतिकारक शक्ती करीत असते. कोरोनाच्या कामात सक्रिय सहभाग घेणारे फ्रन्टलाइन वर्कर ज्यामध्ये शासकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांचे काम अत्यंत जोखमीचे असते, अशावेळी त्यांनादेखील कोरोना होतो. मात्र, आयजीजी रोगप्रतिकारक शक्ती बळकट असल्याने त्यांनाही हे कळून येत नाही कारण या दरम्यान कुठलेही कोरोनासदृश लक्षणे आढळून येत नाहीत. मात्र, त्यांना कोरोनाची लागण झालेली असते.
बॉक्स
असे आहेत गावनिहाय पॉझिटिव्ह अहवाल
या सर्वेक्षणात चंद्रपूर महानगरपालिकेतून ७२६ पैकी २७० तर ग्रामीण भागातून १६७५ पैकी ६०० नमुने पॉझिटिव्ह आढळले. बल्लारपूर तालुक्यातील कोठारीमधून ५० पैकी १५, बल्लारपूर शहर ५४ पैकी २१, बामणी ५० पैकी २९, कळमना ५० पैकी १६ नमुने पॉझिटिव्ह आलेत. चंद्रपूर तालुक्यातील नेरी येथे ५० पैकी १५, दुर्गापूर ५० पैकी १७, ऊर्जानगर ५० पैकी १४, मोरवा ५० पैकी २५, लखमापूर ५५ पैकी २४, लोहारा ५० पैकी ९, चिचपल्ली ५० पैकी १५ पॉझिटिव्ह आले. याचप्रकारे मूल तालुका ७५ पैकी २५, राजुरा तालुका ७४ पैकी ३५, भद्रावती तालुका ५५ पैकी १०, पोंभुर्णा तालुका २५ पैकी १०, चिमूर तालुका ७५ पैकी २१, कोरपना तालुका १०३ पैकी ३१, सिंदेवाही तालुका ५१ पैकी ३०, जिवती तालुका १०५ पैकी २४, गोंडपिपरी तालुका १०५ पैकी २८, ब्रम्हपुरी तालुका १०५ पैकी ४२, नागभीड १०४ पैकी ५९, वरोरा तालुका १६३ पैकी ४९, सावली तालुका ७६ पैकी ३६ इतके नमुने पॉझिटिव्ह आल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.