कोरोनाच्या भीतीने उष्माघातही पळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:30 AM2021-05-20T04:30:14+5:302021-05-20T04:30:14+5:30
चंद्रपूर : मागील वर्षीपासून कोरोना संकटामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी उष्णाघाताच्या दुष्परिणामाकडे दुर्लक्ष केले आहे. दरवर्षी उन्हाळ्याचे दिवस सुरू ...
चंद्रपूर : मागील वर्षीपासून कोरोना संकटामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी उष्णाघाताच्या दुष्परिणामाकडे दुर्लक्ष केले आहे. दरवर्षी उन्हाळ्याचे दिवस सुरू झाल्यानंतर आरोग्य विभागाला प्रारंभी उष्माघात कक्षाची निर्मिती करावी लागत होती. यावर्षीही या कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, अद्याप उष्माघाताचा रुग्ण आढळला नाही. त्यामुळे उष्माघात पळाला की काय, अशी स्थिती सध्या असून मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यात एकही उष्माघाताचा रुग्ण आढळला नसल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
कोरोना प्रादुर्भाव थांबविण्यासाठी लाॅकडाऊन करण्यात आले. याच काळात ऊनही तापले. मागील वर्षापासून नागरिक घरीच असल्यामुळे उष्माघाताचे प्रमाण घटले. या दिवसामध्ये चंद्रपूरसह परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात तापमानाने उच्चांक गाठला. २०२१ मध्ये मार्च महिन्यापासूनच ऊन तापायला लागले. एप्रिलच्या सुरुवातीलाच ४० अंशापर्यंत तापमान होते. मध्यंतरी ४४ अंशापर्यंत तापमान गेले. मागील दोन ते दिन दिवसांपासून तापमान कमी झाले असले तरी आणखी उन्हाळा संपायला अवधी आहे. लाॅकडाऊन तसेच कोरोनाच्या दहशतीमुळे नागरिक घरातच बंद झाले. त्यामुळे उष्माघाताचे परिणाम जाणवले नाहीत. आरोग्य यंत्रणेवर कोरोनामुळे ताण वाढला आहे. मात्र, उष्माघाताचे रुग्ण नसल्याने काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे.
बाॅक्स
उन्हाळा घरातच
जिल्ह्यात मार्च महिन्याच्या शेवटीपासून उन्हाचा पारा वाढला. याच काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडणे बंंद केले. दरम्यान, संचारबंदी त्यानंतर लाॅकडाऊन करण्यात आले. सकाळी ११ वाजेपर्यंत जीवनावश्यक साहित्य खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली. त्यामुळे दुपारच्या उन्हात बहुतांश नागरिक घराबाहेर पडत नाहीत. त्यातच लग्नसमारंभ तसेच इतर कार्यक्रमांवरही बंदी असल्यामुळे नागरिकांचा उष्माघातापासून बचाव झाला आहे.
बाॅक्स
सर्वाधिक तापमान
चंद्रपूर जिल्ह्याचे विदर्भातच नाही तर राज्यात तापमान सर्वाधित राहते. यावर्षीही पारा ४४ अंशापर्यंत पोहचला आहे. मे महिन्यातही पारा वाढलेलाच आहे. दरम्यान, मागील दोन ते तीन दिवसांपासून ढगाळी वातावरण असल्यामुळे तापमान घटले आहे. मात्र, नागरिक कोरोनामुळे घरातच राहणे पसंत करीत असल्यामुळे कोरोनासह उष्माघातापासूनही संरक्षण होत आहे.
कोट
कोरोना संकटामुळे नागरिक घराबाहेर पडले नाही. आरोग्य विभागाने उष्माघातापासून बचाव करण्यासाठी रुग्णालयात कक्षाची स्थापना केली आहे. मात्र, यावर्षी उष्माघाताचे रुग्ण अद्याप आढळला नाही.
-निवृत्ती राठोड
जिल्हा शल्यचिकित्सक