coronavirus; चंद्रपुरातच होत आहे कोरोनाची चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 02:35 PM2020-06-12T14:35:43+5:302020-06-12T14:37:48+5:30
२ जूनपासून चंद्रपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातच कोरोनाची अद्यावत तपासणी प्रयोगशाळा कार्यान्वित झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोना संसर्ग सुरू झाल्यानंतर विदर्भासाठी केवळ नागपूर येथेच रुग्णाच्या स्वॅब अहवालाची तपासणी केली जायची. त्यामुळे रुग्णाचा स्वॅब अहवाल यायला विलंब लागायचा. मात्र आता २ जूनपासून चंद्रपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातच कोरोनाची अद्यावत तपासणी प्रयोगशाळा कार्यान्वित झाली आहे. दररोज दीडशे चाचणीची क्षमता असलेल्या या प्रयोगशाळेत आतापर्यंत सहाशेहून अधिक रुग्णांचा स्वॅब अहवाल तपासण्यात आला आहे. त्यातील चार रुग्ण पॉझिटिव्हही निघाले आहेत.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपुरात कोरोना तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर यासाठी दोन कोटी १८ लाखांचा निधीही दिला. यातून अल्पावधीतच ही प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. २ जूनपासून या प्रयोगशाळेत रुग्णांचे स्वॅब अहवाल तपासले जात आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.एस. मोरे यांच्या मार्गदर्शानात व सुक्ष्म जीवशास्त्र विभाग प्रमख डॉ. राजेंद्र सूरपाम यांच्या नेतृत्वात प्रयोगशाळेचे कामकाज सुरू आहे. यासाठी डॉ. सूरपाम यांच्यासोबत २० जणांची चमूदेखील येथे कार्यरत आहे.
दोन दिवसांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात आढळलेल्या चार पॉझिटिव्ह रुग्णांचे स्वॅब अहवाल याच प्रयोगशाळेत तपासण्यात आले होते.
कोरोनानंतरही होणार प्रयोगशाळेचा उपयोग
देशात कोरोनाने हाहाकार माजविला आहे. संशयित रुग्णांच्या लवकरात लवकर तपासण्या व्हाव्या, यासाठी युध्दपातळीवर काम करीत ही प्रयोगशाळा उभारण्यात आली. पुढे कोरोनाचा प्रादुर्भाव संपुष्टात आल्यानंतरही या प्रयोगशाळा कार्यरत असणार आहे. यात चंडीपुरा (मेंदूज्वर), स्वाईन फ्ल्यू, चिकुन गुनिया यासारख्या आजाराची चाचणी केली जाणार आहे.
२४ तास सेवेत
चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोरोना तपासणी प्रयोगशाळा २४ तास सेवेत आहे. रात्रंदिवस येथे रुग्णाचा स्वॅब अहवाल तपासला जात आहे. सध्या चंद्रपूर जिल्ह्यातील रुग्णांचेच अहवाल येथे तपासले जात आहे. मात्र पुढे प्रयोगशाळेचा विस्तार केल्यानंतर गडचिरोली व जवळच्या जिल्ह्यातीलही रुग्णांचा अहवाल तपासला जाणार आहे.
२ जून २०२० पासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना तपासणी प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यात आली आहे. दररोज १५० स्वॅब अहवाल तपासण्याची क्षमता या प्रयोगशाळेची आहे. येथेच अहवाल तपासला जात असल्याने आता रुग्ण आणि आरोग्य विभागासाठीही सोयीचे झाले आहे.
-डॉ. एस.एस. मोरे,
अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर.