गणेशोत्सवावर महागाईसह कोरोनाचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:34 AM2021-09-09T04:34:49+5:302021-09-09T04:34:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : गणेशोत्सव एका दिवसावर आला आहे. त्यामुळे बाजारपेठ सजली आहे. असे असले तरी कोरोनाचे निर्बंध ...
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : गणेशोत्सव एका दिवसावर आला आहे. त्यामुळे बाजारपेठ सजली आहे. असे असले तरी कोरोनाचे निर्बंध तसेच महागाईमुळे उत्सवावर काही प्रमाणात विरजण पडले आहे. विशेष म्हणजे मूर्तिकारांमध्येही निरुत्साह बघायला मिळत असून, गणेश मंडळांनीही मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही खर्चात हात आखडता घेतला आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक गावात तसेच घराघरात गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते. मात्र, कोरोना संकटामुळे यावर्षीही सार्वजनिक मंडळांकडून गणेश मूर्तींची मागणी घटली आहे. त्यामुळे मूर्तिकारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
दरवर्षी सार्वजनिक मंडळांकडून महिनाभरापूर्वीच मूर्त्यांचे बुकिंग तसेच पूर्ण तयारी केली जात होती. मात्र, यावर्षी अद्याप अनेक मंडळांनी मूर्तीचे बुकिंगसुद्धा केले नसल्याचे मंडळांच्या सदस्यांनी सांगितले. छोटी मूर्ती बसवून यावर्षी गणेशोत्सव साजरा करणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे मूर्तीसाठी लागणारे रंग व इतर साहित्य महागले आहे. त्यामुळे मूर्तीच्या किमती वाढल्या आहेत. दुसरीकडे सजावट तसेच प्रसादाचे साहित्यही महागल्यामुळे भाविकांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येत आहे.