जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 05:00 AM2021-03-22T05:00:00+5:302021-03-22T05:00:33+5:30
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २५ हजार ७३३ वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २४ हजार ६६ झाली आहे. सध्या १२५७ बाधितांवर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे, मागील काही दिवसामध्ये रुग्णसंख्येच्या तुलनेमध्ये बरे होणाऱ्यांची संख्या घटली आहे. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट जिल्ह्यात धोकादायक वळणावर आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. दरम्यान, रविवारी जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतील सर्वाधिक म्हणजेच, २१५ रुग्णांची नोंद करण्यात आली असून दोघांचा जीवसुद्धा गेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात लाॅकडाऊन तर होणार नाही, ना अशी भिती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, शेजारील यवतमाळ, वर्धा तसेच नागपूरमध्ये कोरोना रुग्ण तसेच मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्हाही लाॅकडाऊनच्या उंबरठ्यावर असून नागरिकांनी वेळीच सतर्क होणे आता तरी गरजेचे झाले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २५ हजार ७३३ वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २४ हजार ६६ झाली आहे. सध्या १२५७ बाधितांवर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे, मागील काही दिवसामध्ये रुग्णसंख्येच्या तुलनेमध्ये बरे होणाऱ्यांची संख्या घटली आहे. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट जिल्ह्यात धोकादायक वळणावर आहे. रविवारी मृत झालेल्यामध्ये बालाजी वार्ड, चंद्रपूर येथील ६० वर्षीय पुरूष व ढुमने लेआऊट, गडचांदूर, येथील ७३ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.
आतापर्यंत दोन लाख ५० हजार ९१९ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख १९ हजार ८२४ नमुने निगेटीव्ह आले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत ४१० बाधितांचे मृत्यू झाले आहे. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३७१, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १९, यवतमाळ १६, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.