चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट; ४०१ रुग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 09:12 PM2020-09-11T21:12:18+5:302020-09-11T21:12:37+5:30
शुक्रवारी चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट झाला. एकाच दिवशी नव्या ४०१ रुग्णांची भर पडली आहे. यामुळे जिल्ह्यावासीयांची चिंता वाढली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शुक्रवारी चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट झाला. एकाच दिवशी नव्या ४०१ रुग्णांची भर पडली आहे. यामुळे जिल्ह्यावासीयांची चिंता वाढली आहे. त्यामुळे आता एकूण बाधित रुग्णसंख्या ५२५३ झाली आहे. आतापर्यंत दोन हजार ८९७ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना संसगार्चा वेग आता आणखी वाढला आहे. समूह संक्रमणाच्या विळख्यात जिल्हा असल्याचे दिसून येत आहे. दीडशे, दोनशे, अडीचशे याप्रमाणे रुग्ण वाढृू लागल्यानंतर आता शुक्रवारी चक्क ४०१ नव्या रुग्णांची भर पडली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच दिवशी रुग्ण वाढत असल्याने आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांवरील ताण वाढला आहे.
आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, २४ तासांमध्ये पाच कोरोना बाधितांचा मृत्यू झालेला आहे. यामध्ये बालाजी वॉर्ड चंद्रपूर येथील ४८ वर्षीय पुरुष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला ४ सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह उच्च रक्तदाब, मधुमेह तसेच न्युमोनियाचा आजार असल्याने ११ सप्टेंबरला पहाटे त्याचा मृत्यू झाला.
दुसरा मृत्यु सिस्टर कॉलनी चंद्रपूर येथील ४२ वर्षीय महिला बाधितेचा आहे. ९ सप्टेंबरला बाधितेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे भरती करण्यात आले होते. ११ सप्टेंबरला पहाटे बाधितेचा मृत्यू झाला आहे. या बाधितेला कोरोनासह न्युमोनिया होता. तिसरा मृत्यु माजरी, भद्रावती येथील ५५ वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला कोरोनासह न्युमोनियाचा आजार होता.
चवथा मृत्यू बल्लारपूर येथील ५६ वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधितालाही कोरोनासह न्युमोनियाचा आजार होता तर पाचवा मृत्यु ब्रह्मपुरी येथील ७८ वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला ९ सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने १० सप्टेंबरला त्याचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ६१ बाधितांचा मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ५७, तेलंगणा एक, बुलडाणा एक व गडचिरोली जिल्ह्यातील दोन बाधितांचा समावेश आहे.
जिल्ह्यात २४ तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहरातील २२०, कोरपना तालुक्यातील १२, गोंडपिपरी तालुक्यातील तीन, चिमूर तालुक्यातील १९, नागभीड तालुक्यातील एक, पोंभूर्णा तालुक्यातील चार, बल्लारपूर तालुक्यातील २३, ब्रह्मपुरी तालुक्यातील ३२, भद्रावती तालुक्यातील १६, मूल तालुक्यातील २७, राजुरा तालुक्यातील २०, वरोरा तालुक्यातील १०, सावली तालुक्यातील दोन, सिंदेवाही तालुक्यातील आठ, गडचिरोली येथून आलेले दोन तर उमरेड-नागपूर येथून आलेले दोन असे एकूण ४०१ बाधित पुढे आले आहे.