चंद्रपूर जिल्ह्यात आलेली ‘ती’ पूर्ण ट्रॅव्हल्सच निघाली कोरोना संक्रमित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 12:36 PM2020-07-28T12:36:47+5:302020-07-28T12:38:48+5:30
राईस मिलच्या कामासाठी बिहार राज्यातून ६५ मजुरांना दोन ट्रॅव्हल्सच्या साहाय्याने आणण्यात आले. यातील एका ट्रॅव्हल्समध्ये असलेले सर्वच ३२ मजूर कोरोनाबाधित निघाले आहे.
राजू गेडाम।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: राईस मिलच्या कामासाठी बिहार राज्यातून ६५ मजुरांना दोन ट्रॅव्हल्सच्या साहाय्याने आणण्यात आले. यातील एका ट्रॅव्हल्समध्ये असलेले सर्वच ३२ मजूर कोरोनाबाधित निघाले आहे.
देशात कोरोनाने थैमान घातले असताना राईस मिल मालकाने पैसे कमाविण्याच्या नादात चक्क बिहार राज्यातून मजुरांना आणले. प्रशासनाच्या सर्व नियमाची पायमल्ली केल्याने मूल शहरात कोरोनाचा संक्रमण वाढले. मूल शहराबरोबरच तालुक्यातदेखील कोरोनाचे संक्रमण वाढत आहे. जानाळा येथे झालेल्या लग्नसमारंभामुळे रूग्ण संक्रमित झाले. त्यानंतर ६५ मजूर राईस मिलच्या कामासाठी बिहार राज्यातून दोन टॅव्हल्सने आणण्यात आले.
यातील एका ट्रव्हल्समधील सर्वच ३२ मजूर पॉझिटिव्ह आले. ही संपूर्ण ट्रॅव्हल्सच कोरोना संक्रमित निघाली. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यातील एक परप्रांतीय मजूर आधीपासूनच मूल येथे वास्तवास होता तर राईस मिलमध्ये काम करणारा बोरचांदली येथील एका कर्मचाऱ्याचा स्वॅब अहवालदेखील पॉझिटिव्ह आलेला आहे. बोरचांदली येथील हा कर्मचारी मागील अनेक दिवसांपासून धान खरेदी व इतर आनुषंगिक कामासाठी मूलच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात व इतर गावात फिरून आपली कामे करीत होता. त्याचा अडते, व्यापारी यांच्यासह अनेकांशी संपर्क आलेला आहे.
तसेच याच राईस मिलजवळ चहाची टपरी चालविणाऱ्याचा अहवालही पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या संपर्कातील लोकांचादेखील स्वॅब घेण्यात येणार आहे. त्यामुळे संपर्कातील लोकांचे अहवाल काय येते, याकडे लक्ष लागले आहे. जानाळा येथे झालेल्या लग्न समारंभात ५० च्या वर लोक एकत्रित आले होते. या सोहळ्यातूनही कोरोनाचा बराच संसर्ग झाला आहे.
शासनाने जाहीर केलेल्या नियमानुसार ५० टक्के क्षमतेनेच प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी आहे. असे असताना, एवढे मजूर दोन ट्रॅव्हल्समध्ये आले कसे,श असा प्रश्न निर्माण झाला आहे. या ६५ मजूरांपैकी अनेक मजुरांकडे ई-पासदेखील नसल्याची माहिती आहे. दोन ट्रॅव्हल्समध्ये एवढे ई-पासधारक मजूर आणणेही शक्य नाही. मिळालेल्या माहितीनुसार, प्रशासनाकडून ३० मजुरांना ओम साई मील येथे आणण्यासाठी परवानगी दिली होती, मात्र प्रत्यक्षात ६५ मजुरांना आणण्यात आले. या सर्व मजुरांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवणे बंधनकारक होते. मात्र, स्थानिक राईस मील मालकाने मजुरांना सुविधा नसताना गृह अलगीकरणात ठेवले.
बिहार राज्यातून आलेल्या ६५ मजुरांपैकी ३२ मजुरांचे स्वॅब पॉझिटिव्ह आले असून उर्वरित ३३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यासंदर्भात येथील तलाठी यांच्या अहवालावरून पोलीस स्टेशन मूल येथे तक्रार देण्यात आली आहे.
- यशवंत पवार,
प्रभारी तहसीलदार, मूल