कोरोनाचा शिरकाव आमच्या गावांमध्ये होऊ देणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:29 AM2021-05-18T04:29:10+5:302021-05-18T04:29:10+5:30
भटाळीसह अनेक गावांचा निर्धार : तालुक्यातील अनेक गावांनी ठेवले कोरोनाला दूर सचिन सरपटवार भद्रावती : कोरोनाच्या पहिल्या लाटेची तीव्रता ...
भटाळीसह अनेक गावांचा निर्धार
: तालुक्यातील अनेक गावांनी ठेवले कोरोनाला दूर
सचिन सरपटवार
भद्रावती : कोरोनाच्या पहिल्या लाटेची तीव्रता कमी होत नाही तोच दुसऱ्या लाटेने थैमान घातले अन् लगेच तिसऱ्या लाटेचीही चाहूल लागली. अशातच भद्रावती तालुक्यातील भटाळी ग्रामपंचायतीसह अन्य चौदा ते पंधरा ग्रामपंचायतींच्या विविध गावांमध्ये कोरोनाचा अद्यापही शिरकाव झालेला नाही, ही एक सकारात्मक बाब आहे. कोरोना नियमांचे पालन करत सकारात्मक भावनेच्या बळावर यांनी कोरोनाला दूर ठेवले.
भटाळी ग्रामपंचायतीचे सरपंच सुधाकर रोहणकर यांच्याशी संपर्क साधला असता कोरोना नियंत्रणासाठी ग्रामपंचायतमध्ये एका कमिटीची स्थापना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. भटाळी ग्रामपंचायतीअंतर्गत भटाळी, नंदुरी खुर्द ,नांदुरा ही तीन गावे असून अंदाजे लोकसंख्या नऊशे ते हजार इतकी आहे.
कमिटीद्वारे सुरुवातीलाच गावांमध्ये फवारणी करण्यात आली. सॅनिटायझरचा वापर करण्यात आला. डॉक्टर नंदकिशोर तसेच आशा वर्कर्स, शिक्षक, ग्रामसेवकाच्या माध्यमातून गावातील प्रत्येक घरी जाऊन नागरिकांची ऑक्सिजन लेव्हल व ताप तपासण्यात आला. सरपंच सुधाकर रोहणकर यांची प्रामुख्याने उपस्थिती राहत होती. ऑक्सिजन लेवल ९० च्या आत असेल तर सरपंचांना त्वरित माहिती देऊन रुग्णाची टेस्टिंग करण्यात येत आहे. बाहेरच्या लोकांना गावामध्ये प्रवेश देण्यात येत नाही. या गावांमध्ये सरपंच यांच्या उपस्थितीत बोटावर मोजण्याइतक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न लावण्यात आले.
४५ या वयोगटांतील जवळपास सगळ्याच नागरिकांच्या लसीकरणाचा पहिला डोस या ठिकाणी पूर्ण झाला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली आहे. या गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव होऊ देणार नाही, असा सरपंच सुधाकर रोहणकर यांच्यासह गावकऱ्यांनी ठाम निर्धार केला आहे.
टाकळी ग्रामपंचायतीमधील बेलोरा गावातसुद्धा कोरोनाचा शिरकाव नसल्याचे टाकळी ग्रामपंचायत उपसरपंच प्रवीण बंदुरकार यांनी सांगितले. तालुक्यात चंदनखेडा, मुधोली, माजरी, नंदोरी, घोडपेठ याठिकाणी विलगीकरण केंद्र चालू आहे.
कोट
तालुक्यात अनेक गावांत कोरोनाचा अद्यापही शिरकाव झाला नाही. ही खरंच आनंदाची बाब आहे. ज्या गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला नाही, त्या गावांचे अन्य ग्रामस्थांनी अनुकरण करावे. कोरोना नियमांचे पालन करावे.
- महेश शितोळे,
तहसीलदार भद्रावती.