कोरोनाने जिल्ह्यात दीड हजारांवर मृत्यू, वारसाला मिळणार 50 हजार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2021 05:00 AM2021-11-29T05:00:00+5:302021-11-29T05:00:38+5:30
कोविड प्रकरणात व्यक्तीचा मृत्यू चाचण्यांच्या दिनांकापासून किंवा रुग्णालयातील दिनांकापासून ३० दिवसांच्या आत झाला असल्यास अशा व्यक्तीचा मृत्यू कोरोनाने झाला असे समजण्यात येणार आहे. यामध्ये रुग्णांना आत्महत्या केली असेल तरीही त्याच्या कुटुंबीयांना मदत मिळणार आहे. एखाद्या व्यक्तीचा रुग्णालयात मृत्यू झाला असेल किंवा मृत्यू ३० दिवसांनंतर झाला असेल तरीही त्याचा कोविडने मृत्यू समजण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोना संकटामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला. अनेक कुटुंबांतील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यामुळे या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. या कुटुंबाची वाताहत होऊ नये, त्यांना थोडाफार दिलासा मिळावा यासाठी कुुटुंबीयांना ५० हजारांची आर्थिक मदत करण्यात येणार आहे. यासाठी आता राज्य शासनाने एक आदेश काढला असून वेबपोर्टलच्या माध्यमातून अर्ज करता येणार आहे.
सद्य:स्थितीत कोरोना आटोक्यात असला तरी संकट मात्र कायम आहे. अनेक बालकांना आपल्या आई-वडिलांना गमवावे लागले तर शेकडो कुटुंबीय उघड्यावर पडले आहेत. या सर्व कुटुंबांना शासनाच्या वतीने ५० हजारांची मदत केली जाणार आहे. शासनस्तरावरून अधिकृत आदेश निघाला नव्हता. त्यामुळे मदत मिळणार की, नाही याबाबत शंका व्यक्त केली जात होती.
असा करा अर्ज...
- राज्य शासनाने विकसित केलेल्या वेबपोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. यासाठी अर्जदाराला स्वत: किंवा सेतू केंद्र, ग्रामपंचायतीत सीएससी, एसपीव्हीमधून अर्ज करता येणार आहे.
ही कागदपत्रे हवी
- अर्जदाराचा स्वत:चा तपशील, आधार क्रमांक किंवा आधार नोंदणी क्रमांक, अर्जदाराचा स्वत:चा बँक तपशील, मृत पावलेल्या व्यक्तीचा तपशील, मृत पावलेल्या व्यक्तीचे जन्म-मृत्यू नोंदणी अधिनियम, १९६९ खालील मृत्यू प्रमाणपत्र, इतर निकट नातेवाइकांचे नाहरकत असल्याचे स्वयं घोषणापत्र सादर करावे लागणार आहे.
अशा असतील अटी
- - कोविड प्रकरणात व्यक्तीचा मृत्यू चाचण्यांच्या दिनांकापासून किंवा रुग्णालयातील दिनांकापासून ३० दिवसांच्या आत झाला असल्यास अशा व्यक्तीचा मृत्यू कोरोनाने झाला असे समजण्यात येणार आहे. यामध्ये रुग्णांना आत्महत्या केली असेल तरीही त्याच्या कुटुंबीयांना मदत मिळणार आहे. एखाद्या व्यक्तीचा रुग्णालयात मृत्यू झाला असेल किंवा मृत्यू ३० दिवसांनंतर झाला असेल तरीही त्याचा कोविडने मृत्यू समजण्यात येणार आहे. मेडिकल प्रमाणपत्रामध्ये कोविडमुळे मृत्यू अशी नोंद नसली तरीही अटींची पूर्तता होत असेल तर त्यांचे कुटुंबीय अनुदानास पात्र राहणार आहेत.
मृत्यू संख्या अधिक?
जिल्हा प्रशासनाने १ हजार ५४३ जणांचा मृत्यू कोरोनाने झाल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, काही रुग्णांनी इतर जिल्ह्यात तसेच राज्यामध्ये जाऊन उपचार घेतला आहे. त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. तेथे तशी नोंद आहे. तर दुसऱ्या जिल्ह्यातील काही नागरिकांनी येथे उपचार घेतला आहे. त्यांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मृत्यूचा नेमका आकडा सांगणे कठीण जाणार आहे.
आठवडाभरानंतर होणार वेबपोर्टल तयार
- कोविडमुळे मृत्यू झालेल्या कुटुंबीयातील वारसांना आर्थिक मदत देण्यासाठी राज्य शासन वेबपोर्टल तयार करणार असून या पोर्टलवर अर्ज करता येणार आहे.
- वेब पोर्टल कार्यान्वित झाल्यानंतर अर्जदार आपला अर्ज करू शकणार आहे.