कोरोना रुग्णाच्या घरातील कचरा घंटागाडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:28 AM2021-04-22T04:28:43+5:302021-04-22T04:28:43+5:30
सिंदेवाही : कोरोनाची लागण झालेल्या, परंतु उपचारानंतर घरात थांबणाऱ्या व गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या वापरात आलेले साहित्य ...
सिंदेवाही : कोरोनाची लागण झालेल्या, परंतु उपचारानंतर घरात थांबणाऱ्या व गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या वापरात आलेले साहित्य मास्क, हातमोजे, औषधांच्या बाटल्या आधीची योग्यरीत्या विल्हेवाट न लावता थेट सर्व्हिस लाईनमध्ये उघड्यावर तसेच घंटागाडीत टाकल्या जात आहे. या प्रकारामुळे शहरात कोरोना प्रसाराला पाठबळ मिळत असल्याचे दिसून येत आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करताना प्रशासकीय यंत्रणेच्या नाकीनऊ येत आहे. नागरिक याबाबत गंभीर व्हायला तयार नाही. मास्क लावणे, चार फूट अंतर ठेवणे, हाताला सॅनिटायझर लावणे या नियमाचे पालन करणे अपेक्षित आहे. परंतु तालुक्यात तसे होत नसल्यामुळेच कोरोना बाधित संख्येत वाढ होत आहे. अशा स्थितीत कोरोनाचा प्रसारासाठी गृह विलगीकरणातील रुग्णांच्या घरातून निघणारा कचराही पोषक ठरत आहे. रुग्णांनी घरातील कचरा शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. वापरलेले मास्क, हात मोजे व औषधांच्या रिकाम्या बाटल्या उघड्यावर टाकणे आरोग्यासाठी घातक आहे. घंटागाडीमध्ये कचरा टाकण्यापूर्वी त्याची कल्पना कचरा संकलकांना देणे आवश्यक आहे.