कोरोनामुळे बुरूड समाज पुन्हा अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:21 AM2021-05-28T04:21:28+5:302021-05-28T04:21:28+5:30
चंद्रपूर : मागील वर्षीप्रमाणे या वर्षीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन करण्यात आले. त्यामुळे प्रत्येक व्यावसायिकांचे नुकसान होत आहे. यामध्ये बांबूपासून ...
चंद्रपूर : मागील वर्षीप्रमाणे या वर्षीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन करण्यात आले. त्यामुळे प्रत्येक व्यावसायिकांचे नुकसान होत आहे. यामध्ये बांबूपासून साहित्य तयार करणारा व्यवसायही अपवाद राहिला नाही. मागील दोन महिन्यांमध्ये बांबूपासून विविध साहित्य तयार करणाऱ्या बुरूड व्यावसायिकांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक बुरूड व्यावसायिकांनी विविध साहित्य तयार केले आहे. मात्र लाॅकडाऊन सुरू झाल्यामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. परिणामी साहित्य असूनही विक्रीच होत नसल्याची सध्या त्यांची स्थिती झाली आहे. डोक्यावर कर्ज, कुटुंबाचा गाडा चालवायचा तरी कसा, या विवंचनेत सध्या ते पडले आहेत.
बाॅक्स
कोरोना महामारीचे संकट
मागील दोन महिन्यांत अनेक छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. बांबूपासून टोपल्या, सुपे, आदी वस्तू तयार करणारा बुरूड समाजही संकटात सापडला आहे. आजही काहीजण आपला मूळ व्यवसाय करून जीवन जगत आहेत. बरेच समाजातील लोक हाच पारंपरिक व्यवसाय करीत आहेत. या समाजातील अनेक लोक बांबूविक्रीचाही व्यवसाय करतात. गेल्या अनेक वर्षांपासून बुरूड व्यवसाय टिकविण्यासाठी धडपड करावी लागत आहे. कोरोनामुळे सध्या सर्वच व्यवसाय ठप्प आहेत. त्यामुळे आता हा व्यवसाय टिकविण्याचे आव्हान या समाजासमोर उभे आहे.
बाॅक्स
गांधी चौकात बसतात व्यावसायिक
चंद्रपुराती गांधी चौकात अनेक बुरुड समाजाचे नागरिक टोपले, सूप, आदी साहित्य विक्री करतात. लॉकडाऊनपूर्वी वस्तूंची काही प्रमाणात खरेदी होत होती. मात्र आता ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरवली असल्याने, आर्थिक अडचण येत असल्याने शासनाने मदत करावी, अशी मागणी विक्रेत्यांनी केली.
बाॅक्स
लग्नसराईही गेली
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात लग्न तसेच इतर कार्यक्रम आयोजित केले जातात. या कार्यक्रमांसाठी विविध साहित्यासह बांबूपासून तयार केलेली सुपे, टोपल्यांचीही मागणी असते. मात्र यावर्षी लग्न तसेच इतर कार्यक्रमांवर निर्बंध आले आहे. त्यामुळे अनेकांनी कार्यक्रम रद्द केले. परिणामी बुरड समाजाचा व्यवसायही बुडाला आहे.