कोरोनामुळे जिल्हा रुग्णालयात रखडलेल्या शस्त्रक्रिया सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:20 AM2021-07-11T04:20:00+5:302021-07-11T04:20:00+5:30
गतवर्षी जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर सर्वत्र दहशत पसरली. आरोग्य विभागासमोर मोठे आव्हान उभे ठाकले. राज्य शासनाने पायाभूत आरोग्य सुविधांसोबतच ...
गतवर्षी जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर सर्वत्र दहशत पसरली. आरोग्य विभागासमोर मोठे आव्हान उभे ठाकले. राज्य शासनाने पायाभूत आरोग्य सुविधांसोबतच ऑक्सिजन बेड्स, व्हेंटिलेटर्स व अन्य सुविधा निर्माण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाची दमछाक झाली. कोरोना अजूनही गेला नाही. परंतु, रुग्ण आणि मृतांची संख्या कमी झाली. त्यामुळे आतापर्यंत कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी व्यस्त असलेल्या वैद्यकीय यंत्रणेचा ताण कमी झाली. मागील काही महिन्यांपासून रखडलेल्या शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेत्रशस्त्रक्रियेपासून अन्य आजारांच्या शस्त्रक्रिया करणे सुरू झाले, असा दावा आरोग्य प्रशासनाने केला आहे.
ओपीडीत वाढू लागली गर्दी
कोरोना उद्रेकाच्या कालावधीत ओपीडी रुग्णांची संख्या कमी झाली होती. मात्र, अत्यावश्यक आरोग्य सुविधा सुरू होत्या. माता व बालकांच्या उपचाराकडेही लक्ष दिले जात होते. कोरोनामुळे विविध आजारांचे रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल होण्यास घाबरत होते. आता स्थिती बदली असून ओपीडीतही रुग्णांची संख्या दररोज वाढताना दिसून येत आहे.
अनेकांची काढला अंगावर आजार
कोरोनामुळे विविध आजारांचे रुग्ण रूग्णालयात भरती होण्यास घाबरत होते. शिवाय, आजारावर उपचार आणि शस्त्रक्रिया होत नसल्याने रुग्णालयात जायचेच कशाला, अशी मानसिकता निर्माण झाली होती. कोरोना काळात रुग्णालयात गेल्यास बाधा होईल, याचीही धास्ती असल्याने अनेकांनी अंगावरच आजार काढला. आता उपचार व शस्त्रक्रिया सुरू झाल्याने रूग्ण दाखल होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे.
गरीब रुग्णांचे हाल
कोरोना संसर्ग काळात शासकीय व खासगी रुग्णालयात विविध आजारांच्या रुग्णांना दाखल केले जात नव्हते. खासगी रुग्णालयांचे शुल्क जास्त असल्याने तिथे उपचार घेण्याची गरीब कुटुंबातील रुग्णांची क्षमता नाही. अशा संकटात सापडलेल्या रुग्णांचे प्रचंड हाल झाले. आता उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रातही विविध रुग्णांच्या आजारांवर उपचार सुरू झाले आहेत.
कोट
एक वर्षापासून प्रतीक्षा, आता मुहूर्त मिळाला
मणक्याच्या आजाराने त्रस्त होतो. सर्व आरोग्य तपासण्या झाल्यानंतर शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. मात्र, काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आणि मला घरीच राहावे लागले. या कालावधीत डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधी सुरू होती. त्यामुळे वाचलो. आता कोरोना कमी झाल्याने एक आठवड्यापूर्वी माझ्यावर शस्त्रक्रिया झाली. प्रकृतीही बरी आहे.
-गंगाधर मोटघरे, रुग्ण चंद्रपूर
कोट
कोरोना उद्रेकामुळे थांबवून ठेवलेल्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया सुरू झाल्या आहेत. कोविड तपासणी व उपचार करण्याची आरोग्य यंत्रणेवरील जबाबदारी कायम आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्या प्रत्येक रुग्णाच्या आजारावर उपचार केले जात आहेत. विविध आजारांवरील शस्त्रक्रिया थांबवून ठेवण्यासारखी सध्याची स्थिती नाही.
-डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक, चंद्रपूर