कोरोना, मोबाइलच्या वेडाने उडविली झोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:19 AM2021-06-27T04:19:14+5:302021-06-27T04:19:14+5:30
मोबाइल फोनद्वारे इलेक्ट्रो मॅग्नेटिक रेडिएशन बाहेर निघतात. त्याचा शरीरावर फार मोठा दुष्परिणाम होतो. विशेषत: लहान मुलांसाठी हे उच्च क्षमतेचे ...
मोबाइल फोनद्वारे इलेक्ट्रो मॅग्नेटिक रेडिएशन बाहेर निघतात. त्याचा शरीरावर फार मोठा दुष्परिणाम होतो. विशेषत: लहान मुलांसाठी हे उच्च क्षमतेचे इलेक्ट्रिक मॅग्नेटिक फिल्ड मेंदू व रक्तासाठी हानिकारक असतात. अति वापरामुळे डोकेदुखी, टेन्शन, निद्रानाश व कानाच्या पडद्यावर वाईट परिणाम होतो.
सध्या मोबाइल हा जीवनाचा अविभाज्य भाग झाला, पण काळजीही महत्त्वाची आहे. संपर्क साधण्यापासून ते मनोरंजनापर्यंत प्रत्येक जण मोबाइलवर अवलंबून आहेत. मोबाइलचे फायदे असले, तरी तोटेही आहेत. मोबाइलच्या अतिवापरामुळे तरुण वयातच अनेकांना कान व डोळ्यांचे अनेक आजार होतात मोठ्यांपासून तर लहान मुलांपर्यंत सारेच जण मोबाइलच्या अधीन होत चालले आहेत. त्यातच आता कोरोना संसर्गाने पुन्हा धास्ती निर्माण केली. परिणामी, अनेकांची झोप उडाली आहे. अशा संकटातून बाहेर निघण्यासाठी तत्काळ आरोग्य उपचार आणि समुपदेशन काळाची गरज ठरली आहे, असा निष्कर्ष डॉक्टरांनी मांडला आहे.
शारीरिक हालचाली कमी झाल्या
मोबाइलमुळे अनेकांच्या शारीरिक हालचाली कमी झाल्या आहेत. आळशीपणा वाढू लागला. जवळच्या दुकानातून सामान आणायचे असले, तरी पायी न जाता थेट फोन करून होमडिलिव्हरीद्वारे सामान मागविले जाते. अशा आळशीपणाचे आरोग्यावर दुष्परिणाम होतात. कोरोनामुळे अनेकांनी सकाळी फिरणे बंद केले. शरीराच्या हालचाली कमी झाल्याने झोप व आरोग्याच्या समस्या उद्भवल्या आहेत.
झोप कमी झाल्याचे दुष्परिणाम
मोबाइल रेडिएशनचा वेग हा ८८४ एमएच २ इतका असतो, असे तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे झोपेवर परिणाम होण्याचा धोका आहे. सेलफोनच्या अति वापरामुळे एकाग्रता नष्ट होते. शारीरिक व मानसिक ताण पडतो. मुले अभ्यास करताना मोबाइलवर गेम खेळत असतात व इंटरनेटचा वापर करतात. सेलफोनच्या रेडिएशनचा वाईट परिणाम आपल्या ब्रेनवरही होऊ शकतो. सेलफोनच्या अतिरेकी वापरामुळे रोड अपघातात दिवसेंदिवस वाढ होत आहे. नियम कितीही कडक केले, तरीही लोक ड्रायव्हिंग करताना सेलफोनवर बोलत असतात, त्यामुळे लक्ष विचलित होते, अशी माहिती डॉ.माडूरवार यांनी दिली.
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय झोपेची गोळी नको
चांगली झोप येण्यासाठी कोणत्याही वयोगटातील नागरिकांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय झोपेची गोळी घेऊ नये, असा सल्ला चंद्रपुरातील मनोविकार तज्ज्ञ डॉ.श्रीकांत बेंडले यांनी दिला. कोरोना साथीचे दिवस असल्याने काही आजाराच्या लक्षणांवरून नागरिकांमध्ये भीती उत्पन्न होऊ शकते. मात्र, घाबरण्याचे काही कारण नाही. कोविड १९ सदृश्य लक्षणे दिसल्यास तातडीने चाचणी करून घेण्यासाठी केंद्रात जावे. असेही त्यांनी सांगितले.
कोट
आरोग्य सुदृढ राहण्यासाठी किमान सहा तास झोप घेणे अत्यावश्यक आहे. आजाराच्या धास्तीने, मोबाइल किंवा कॉम्प्यूटरच्या अतिवापराने शरीरावर दुष्परिणाम होतो. विविध गॅजेट्सच्या आहारी गेल्याने निद्रानाश जाणवू लागतो. डोळ्यांच्या अवतीभोवती सुरकुत्या पडू लागतात. हे शरीरासाठी हानिकारक आहे. मोबाइलचा अतिवापर करणे थांबवून त्याऐवजी मन शांत करणारे आवडीचे एखादे चांगले पुस्तक वाचावे. शांत संगीत ऐकावे. त्यामुळे शांत झोप लागण्यास मदत मिळते.
-डॉ.विवेक माडूरवार, हृदयविकार तज्ज्ञ, चंद्रपूर