शिक्षण क्षेत्राला कोरोनाची काजळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 05:00 AM2020-07-06T05:00:00+5:302020-07-06T05:01:27+5:30
मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ लागल्याने तसेच मुले दिवसभर टिव्ही पाहत बसल्याने पालकांची चिंता वाढली आहे. त्यामुळे शाळा व खासगी क्लास चालकांनी विविध अॅपद्वारे व मोबाईलवरून ऑनलाईन शिकवणी वर्ग सुरू केले आहेत. ठराविक वेळेत सर्व मुलांना स्मार्ट फोन देऊन व्हिडीओ कॉलिंग अथवा व्हॉटसअॅपद्वारे नोट्स पाठवून मुलांना शिकवले जात आहे.
राजकुमार चुनारकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : मुलांचे भविष्य प्रकाशमय करणाऱ्या शिक्षण क्षेत्राला कोरोनाची 'काजळी' लागली आहे. कोरोनामुळे शाळा, क्लास ठप्प आहेत. शाळा सुरू होण्यास सप्टेंबर महिना उजाडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालक, शिक्षक, संस्थाचालक काय व कसे करायचे, या चिंतेत आहेत. मुलेही घरात बसून कंटाळली आहेत. आॅनलाईन क्लासमुळे मुले मोबाईलच्या आहारी जाण्याबरोबर त्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.कोरोनामुळे मार्च महिन्यात शाळा लॉकडाऊन झाल्या. तिसरी घटक चाचणी व वार्षिक परीक्षा होऊ शकलेली नाही. केवळ दोन परीक्षांवर मुलांचा निकाल दिला आहे. गेल्या चार महिन्यांपासून मुले घरात आहेत. शाळा सुरु होण्यास आॅगस्ट किंवा सप्टेंबर महिना उजाडणार आहे.
ऑनलाईन शिक्षण पर्याय नव्हे
मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ लागल्याने तसेच मुले दिवसभर टिव्ही पाहत बसल्याने पालकांची चिंता वाढली आहे. त्यामुळे शाळा व खासगी क्लास चालकांनी विविध अॅपद्वारे व मोबाईलवरून ऑनलाईन शिकवणी वर्ग सुरू केले आहेत. ठराविक वेळेत सर्व मुलांना स्मार्ट फोन देऊन व्हिडीओ कॉलिंग अथवा व्हॉटसअॅपद्वारे नोट्स पाठवून मुलांना शिकवले जात आहे. परंतु काही मुले याचा गैरफायदा घेताना दिसत आहेत. क्लास व अभ्यासाच्या नावाखाली पालकांचे मोबाईल दिवसभर मुले वापरत आहेत. क्लास संपला की चित्रपट, वेब सिरीज, कार्टून, वेगवेगळ्या क्लिप मुले पाहत आहेत.
मुलांना मोबाईलचे व्यसन
मुलांना मोबाईलचे व्यसन जडल्यासारखे झाले आहे. दिवसातील सर्वाधिक काळ मोबाईलवर जात असल्याने स्क्रीनच्या प्रखर लाईट व हेडफोनमुळे मुलांना डोळ्याचे व कानाचे विकार होत आहेत. तसेच मोबाईलच्या अतिवापराने अनेकांना डोकेदुखीचा त्रास वाढला आहे. मुले इंटरनेटच्या आहारी जाण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे मुलांत नेत्रविकार, कर्णविकार, डोकेदुखी असे आजार वाढल्याचे दिसत आहे.
आरोग्य महत्त्वाचे की शिक्षण?
शाळा सुरू झाल्या तरी त्या चालविणे अवघड असणार आहे. कारण सोशल डिस्टन्स ठेवावा लागणार आहे. दोन सत्रांत शाळा सुरू कराव्या लागतील. शिक्षकांना पूर्ण वेळ शाळेत थांबावे लागेल. यातूनही एखाद्या मुलाला कोरोनाचा संसर्ग झाला तर शाळाच बंद करावी लागणार आहे. यामुळे मुलांना शाळेत पाठवायचे की नाही, याबाबत पालकांत अद्यापही चिंता आहे.
सॅनिटायझर, मास्क नवीन ओझे
सध्या मुलांवर दप्तराचे ओझे आहे. त्यात आता शाळेला जाताना सॅनिटायझर, मास्क, पाणी, साबण याचे ओझे सोबत न्यावे लागणार आहे. दैनंदिन आरोग्य तपासणी करण्याचे काम शाळांवर वाढणार आहे. खेळ, स्नेहसंमेलन, सहली यावर निर्बंध येणार आहेत.
ऑनलाईन शिक्षण हा कायमस्वरूपी पर्याय होऊ शकत नाही, कारण वर्गात फेस टू फेस शिकवणे हे जितके परिणामकारक होते, त्याप्रमाणे ऑनलाईन होत नाही. काही नियम घालून शाळा लवकर चालू करणे गरजेचे आहे. पण सगळ्याच शाळा यासाठी पात्र ठरतील का, हा प्रश्न आहे. कारण शाळेची इमारत, वर्गखोल्यांची जागा, संख्या व सोशल डिस्टन्स हे सगळे नियम पाहिले तर शाळा सुरू करणे अवघड आहे. काही पालक शाळा चालू करा, असे म्हणतात. कारण शैक्षणिक नुकसान होता कामा नाही, असे त्यांचे मत आहे. तर काही पालक, मुलांच्या आरोग्यापेक्षा शिक्षण महत्त्वाचे नाही, असे म्हणत आहे.
-भास्कर बावनकर,
जिल्हाध्यक्ष, शिक्षक भारती संघटना, चंद्रपूर