ग्रामीण भागात कोरोना सुसाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:28 AM2021-04-16T04:28:21+5:302021-04-16T04:28:21+5:30
चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामध्ये शहरी भागासह ग्रामीण भागातील नागरिकही मोठ्या संख्येने बाधित ...
चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामध्ये शहरी भागासह ग्रामीण भागातील नागरिकही मोठ्या संख्येने बाधित होत आहेत. त्या तुलनेत आरोग्य यंत्रणा सद्यस्थितीत अपुरी पडत आहे. अनेक गावांमध्ये रुग्ण आढळत आहेत. मात्र, पाहिजे त्या सोयीसुविधा त्यांना मिळत नसल्याची स्थिती आहे. दरम्यान, आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांच्यासह सरपंच, पोलीस पाटील या रुग्णांवर लक्ष ठेवून आहेत. रुग्णांची संख्या भरमसाठ वाढत असल्यामुळे गावांची आरोग्य यंत्रणा अपुरी पडत आहे. काही प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामध्ये चाचणी होत आहेत. मात्र, रुग्णांची प्रकृती खालावली तर त्याला थेट शहर गाठावे लागत आहे. मात्र, शहरातही रुग्णालये फुल्ल असल्याने रुग्णांना इकडून तिकडे सारखे फिरावे लागत आहे.
मागील वर्षी मार्च महिन्यापासून कोरोना संक्रमणाला सुरुवात झाली. मध्यंतरी यामध्ये सुधारणा झाल्याने जनजीवन रुळावर आले होते. मात्र, आता पुन्हा रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. लक्षणे कमी असलेले रुग्ण गृहविलगीकरणात राहून औषधोपचार घेत आहेत. त्यांच्या घरी आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडीसेविका औषधोपचार पुरवित आहेत. दरम्यान, सरपंच, पोलीस पोटीलही या रुग्णांवर लक्ष ठेवून असून सातत्याने विचारपूस करीत आहेत. काही गावांमध्ये कोरोना चाचण्या करण्याचेही काम सुरू करण्यात आले आहे. असे असले तरी जिल्ह्यातील काही गावांमध्ये मात्र परिस्थिती बिकट आहे. अनेक रुग्णांना वेळेवर औषधोपचारसुद्धा मिळत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे प्रत्येक गावाकडे आरोग्य विभागाने विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
बाॅक्स
गावामध्ये वाॅच कोणाचा?
जिल्ह्यात १ हजार ८३६ गावांची संख्या आहे. यातील काही गावांमध्ये आरोग्य यंत्रणेतील कर्मचारी काम करीत असले तरी दुर्गम आणि लोकसंख्येने कमी असलेल्या गावांमध्ये आशा वर्कर, अंगणवाडीसेविका, सरपंच, पोलीस पाटील रुग्णांवर लक्ष ठेवून आहेत. ज्या रुग्णांच्या घरी जागा नसेल अशा रुग्णाला प्राथमिक आरोग्य केंद्र, उपक्रेंद्र तसेच प्रकृती जास्त वाईट असल्यास जिल्हास्तरावर पाठविले जात आहे.
बाॅक्स
काॅन्ट्रॅक्ट ट्रेसिंग नाहीच
गावातील रुग्ण पाॅझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकांची टेस्ट केली जाते. या प्रकियेला काॅन्ट्रॅक्ट ट्रेसिंग म्हणतात. मात्र, मागील काही दिवसांमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे प्रत्येक रुग्णांच्या काॅन्टॅक्ट ट्रेसिंगकडे दुर्लक्ष होत आहे. काही जण आवाहन करीत आहेत. मात्र, त्याकडे नागरिक पाहिजे तसे लक्ष देत नसल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे.
बाॅक्स
जिल्ह्यातील एकूण रुग्ण
३५६८०
ग्रामीण भागातील रुग्णसंख्या
००००