कोरोनाने गिळंकृत केला शाळेच्या पहिल्या दिवसाचा आनंद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:19 AM2021-06-29T04:19:40+5:302021-06-29T04:19:40+5:30

चंद्रपूर : शाळेचा पहिला दिवस म्हटले की नवी पुस्तके, नवा गणवेश, शाळा आणि वर्गाच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांचे औक्षण व गुलाब ...

Corona swallowed the joy of the first day of school! | कोरोनाने गिळंकृत केला शाळेच्या पहिल्या दिवसाचा आनंद !

कोरोनाने गिळंकृत केला शाळेच्या पहिल्या दिवसाचा आनंद !

Next

चंद्रपूर : शाळेचा पहिला दिवस म्हटले की नवी पुस्तके, नवा गणवेश, शाळा आणि वर्गाच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांचे औक्षण व गुलाब पुष्प देऊन स्वागत, तर कुठे गोडधोड खाऊ घालण्याच्या उपक्रमामुळे बालकांचा आंनद गगनात मावेनासा होतो. मात्र, हा आनंद कोरोना महामारीने गतवर्षीप्रमाणे यंदाही गिळंकृत केला आहे. ऑनलाइन शिक्षणाची टूम निघाली. मात्र, त्यामध्ये सतराशेसाठ विघ्न. परिणामी, चंद्रपूर मनपाच्या एका शाळेचा अपवाद वगळल्यास सोमवारी बहुतांश शाळांतील पहिल्या दिवसाचा ऑनलाइन किलबिलाट नावापुरताच राहिल्याचे पुढे आले आहे.

कोरोनामुळे शिक्षण क्षेत्राची पुरती वाट लागली. गतवर्षापासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनाचे प्रचंड नुकसान झाले. जि. प. शाळांमध्ये शिकणारी मुले मुळातच अभावग्रस्त समुदायातून येतात. या उपेक्षित समुदायातील हजोरा विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यासक्रम पूर्ण करणे जड गेले. स्मार्ट मोबाइल उपलब्ध नसणे व नेटवर्कचा प्रश्न अशा नानाविध समस्यांमुळे ऑनलाइन शिक्षणाचा बोजवारा उडाला. त्यामुळे परीक्षा न घेताच विद्यार्थ्यांना पुढील वर्गात वर्गोन्नती देण्यात आली. मात्र, यंदाही कोरोना महामारीचे संकट अद्याप दूर झाले नाही. या महामारीच्या संकटातच सोमवारपासून शाळा सुरू झाल्या. विद्यार्थी व पालकांकडे उपलब्ध असलेल्या साधनांद्वारे विद्यार्थ्यांना ऑनलाइन धडे देण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले; परंतु जिल्ह्यातील बहुतांश शाळांचा पहिला दिवस अध्यापनाविना गेला आहे.

पहिल्या दिवशी शाळांमध्ये नेमके काय घडले?

जि. प. शाळांमध्ये शिक्षक हजर झाले. शाळेच्या भौतिक सुविधांबाबत चर्चा केली. बऱ्याच शाळांमध्ये कोरोना गृहविलगीकरण होते. त्यामुळे स्वच्छता करण्यात आली. दाखलपात्र विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन व ऑफलाइन नोंदणी घेतल्या. पालक शाळेत आल्यानंतर पाल्यांबाबत माहिती जाणून समुपदेशन केले. काही शाळांनी उपलब्ध असलेली जुनी पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांच्या घरी पोहोचविली. दृकश्राव्य व ऑनलाइन अभ्यासक्रमाची लिंक पालकांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर सेंड करून शिक्षकांनी पालकांशी संवाद साधला.

‘त्या’ शिक्षकांनी पाळली फक्त औपचारिकता !

आदिवासी व दुर्गम भागातील काही शिक्षकांनी शाळेच्या पहिल्या दिवशी फक्त औपचारिक उपस्थिती दर्शविली. शासनाच्या आदेशांना धाब्यावर बसवून सायंकाळी ५ वाजेपूर्वीच शाळेतून काढता पाय घेतला. दाखलपात्र विद्यार्थ्यांची चर्चा आणि ऑनलाइन नोंदणी करण्याच्या कर्तव्याकडेही कानाडोळा केला.

जि.प.च्या मार्गदर्शक सूचनांअभावी गोंधळ

प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचा आदेश शालेय शिक्षण संचालकांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर दरवर्षी चंद्रपूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी हेदेखील मार्गदर्शक सूचना जारी करतात. मात्र, कोरोनामुळे हा आदेश निघाला नाही. त्यामुळे प्रतिबंधात्मक खबरदारीसोबतच नवीन शैक्षणिक सत्राबाबत स्थानिक मार्गदर्शक सूचना नसल्याने पहिल्या दिवशी नेमके करायचे काय, याबाबत बरेच मुख्याध्यापक व शिक्षक संभ्रमात होते.

संकटातही काही शाळांनी शोधली संधी

मागील शैक्षणिक सत्रातील नुकसान लक्षात घेऊन काही शाळांच्या मुख्याध्यापकांनी यंदा संकटातही मार्ग काढण्याची धडपड केल्याचे पहिल्या दिवशी दिसून आले. जिल्ह्यातील ९ लाख १५ हजार विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळाली नाही. पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके मिळाल्यास विद्यार्थ्यांचा उत्साह उंचावतो, हे लक्षात घेऊन चंद्रपूर पंचायत समितीअंतर्गत उसगाव जि. प. शाळेचे मुख्याध्यापक विजय कुमरे यांनी शिक्षकांच्या साहाय्याने पात्र विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन जुनी पाठपुस्तके वितरित केली. पोंभुर्णा पं. स.अंतर्गत डोंगरहळदी तुकूम जि. प. शाळेचे मुख्याध्यापक जे. डी. पोटे यांच्या मार्गदर्शनात शिक्षकांनी पालकांच्या उपस्थितीत दाखलपात्र विद्यार्थ्यांची ऑफलाइन नोंदणी केली. शिक्षण विभागाने तयार केलेल्या विविध ॲपबाबतही तांत्रिक माहिती देऊन ऑनलाइन शिक्षणाबाबतचे गैरसमज दूर केले. मुख्याध्यापक नीत यांच्यामुळे चंद्रपूर मनपाच्या बाबूपेठ परिसरातील सावित्रीबाई फुले शाळेने आज ऑनलाइन वर्ग घेतला.

गतवर्षीच्या अनुभवामुळे पालकांत निरुत्साह

गतवर्षी ऑनलाइन शिक्षणामुळे अपेक्षाभंग झालेल्या पालकांमध्ये यंदा निरुत्साह दिसून आला. कोरोनामुळे मुलांचे वर्षे वाया गेले. यंदाही असेच सुरू राहिले तर मुला-मुलींच्या शिक्षणाचे काय, असा त्यांचा सवाल आहे. जी गावे १०० टक्के कोरोनामुक्त आहेत तिथे तरी शाळा सुरू झाल्यास मुले आवडीने शिकतील. शिक्षकांनी शिकविलेले ज्ञान आत्मसात करतील, असे पालकांचे म्हणणे आहे.

Web Title: Corona swallowed the joy of the first day of school!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.