ग्रामपंचायत निवडणुकीतील कार्यकर्त्यांचीही कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 05:00 AM2020-12-23T05:00:00+5:302020-12-23T05:00:42+5:30
पहिल्या टप्प्यात १६ हजार ६९ फ्रंटलाईन वर्कर अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात येणार आहे. त्यातही प्राधान्यानाने आरोग्य विभाग व महिला बालविकास विभागाच्या कर्मचाऱ्यांना लस टोचली जाणार आहे. लस टोचण्यासाठी ५२९ लस टोचकांचे व २५३ सुपरवायझर यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले. प्रत्येक लसीकरण सत्रात १०० लाभार्थ्यांना लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील पाच हजार अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामपंचायत निवडणूक उमेदवार, कार्यकर्ते व कार्यरत कर्मचारी, मंगल कार्यालय व लॉनमधील कर्मचारी, बँडवाल्यांची कोरोना तपासणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी मंगळवारी आयोजित जिल्हा शिघ्र कृती दल समितीची बैठकीत दिल्या.
यावेळी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले, मनाचे आयुक्त राजेश मोहिते, पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरुण हुमणे, निवासी जिल्हाधिकारी मनोहर गव्हाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ.संदीप गेडाम उपस्थित होते.
पहिल्या टप्प्यात १६ हजार ६९ फ्रंटलाईन वर्कर अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात येणार आहे. त्यातही प्राधान्यानाने आरोग्य विभाग व महिला बालविकास विभागाच्या कर्मचाऱ्यांना लस टोचली जाणार आहे. लस टोचण्यासाठी ५२९ लस टोचकांचे व २५३ सुपरवायझर यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले. प्रत्येक लसीकरण सत्रात १०० लाभार्थ्यांना लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. लसीकरण सत्राच्या ठिकाणी एक प्रतिक्षालय, एक लसीकरणाची खोली व लसीकरणानंतर संबंधितांची पाहणी करण्याकरिता एक ऑब्जर्वेशन रुम असेल. प्रत्येक पथकामध्ये एकूण पाच लसीकरण अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी गुल्हाणे यांनी दिली.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) संग्राम शिंदे, जिल्हा शिक्षणाधिकारी (मा.) उल्हास नरड, जिल्हा शिक्षणाधिकारी (प्रा.) दिपेंद्र लोखंडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद किन्नाके, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश साठे, अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अविष्कार खंडाळे, युएनडीपीचे जिल्हा प्रतिनिधी गणेश धोटे व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
लसीकरणासाठी १ हजार ८२० स्थळांची निवड
लसींची साठवणूकीसाठी जिल्हा व उपजिल्हा लस भंडार, एक मनपा लस भंडार व इतर ७८ शितसाखळी केंद्र सज्ज आहेत. सर्व केंद्र मिळून लस साठवणूकीकरीता ९४ आयएलआर व ११२ डिप फ्रिजर शितसाखळी उपकरणे उपलब्ध आहेत. लसीकरणाकरीता १, ८२० स्थळांची निवड झाली आहे.