वकिली व्यवसायालाही कोरोनाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:29 AM2021-05-20T04:29:43+5:302021-05-20T04:29:43+5:30
कोर्ट, कचेरी, दुय्यम सहनिबंधक कार्यालये आणि इतर सर्व शासकीय कार्यालये, आस्थापना बंद असल्याने वकिलांसह नोटरींची सर्व कामे बंद आहेत. ...
कोर्ट, कचेरी, दुय्यम सहनिबंधक कार्यालये आणि इतर सर्व शासकीय कार्यालये, आस्थापना बंद असल्याने वकिलांसह नोटरींची सर्व कामे बंद आहेत. या वकिलांसोबत काही टायपिस्टनाही काम मिळत नसल्यामुळे ते सुद्धा आर्थिक अडचणीत सापडले आहेत. नवीन नोटरींना रजिस्टर, नोटरी रिसिट बूक व शिक्के बनवून मिळत नसल्याने उत्पन्नाचे साधनच बंद झाले आहे.
मागील काही दिवसांमध्ये जिल्ह्यात वकिलांची संख्या वाढली आहे. त्यामुळे काही वकिलांकडे अन्य दिवसामध्येही पाहिजे तसे कामच मिळत नसल्याची स्थिती आहे. त्यातच आता लॉकडाऊन झाल्यामुळे वकिलांना कामच नाही. त्यामुळे ज्यांची आर्थिक स्थिती मजबूत आहे त्यांना फरक पडला नसला तरी जे नव्याने या व्यवसायात आले आहेत त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे, काही सिनिअर वकिलांकडे काम करणारेही अडचणीत सापडले आहेत.
बाॅक्स
टायपिस्टही आले अडचणीत
न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय परिसरात संगणक, तसेच टायपिंगवर विविध कागदपत्रे तयार करून देणाऱ्या टायपिस्टलाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. बेरोजगारीवर मात करून अनेकांनी या परिसरासह शहरातील विविध भागांमध्ये छोटा-मोठा व्यवसाय सुरू केला आहे. मात्र, सद्य:स्थितीत हाताला कामच नसल्यामुळे त्यांनाही आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. राज्य शासनाने विविध नोंदणीकृत मजूर, नोंदणीकृत ऑटो चालक, तसेच इतरांना काही प्रमाणात का होईना आर्थिक लाभ दिला आहे. मात्र, टायपिस्ट, तसेच यावर अवलंबून असलेल्यांची मात्र निराशा झाली आहे.