कोरोनाचा फटका; नव्या घरात भाडेकरूच मिळेना; चंद्रपुरातील वास्तव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 04:04 PM2020-06-08T16:04:52+5:302020-06-08T16:05:50+5:30
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेकजण स्वगृही गेले. त्यामुळे नव्याने घर भाड्याने देणे आणि घेणे या दोन्ही गोष्टी अवघड झाल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेकजण स्वगृही गेले. त्यामुळे नव्याने घर भाड्याने देणे आणि घेणे या दोन्ही गोष्टी अवघड झाल्या आहेत. नोकरी गमावल्याने अनेकांनी राहते घर खाली करून गाव गाठले. ती घरे बंद आहेत. तर नवीन भाडेकरुंचा स्वीकार करण्यास इमारतींमधील अन्य सदस्य राजी होत नसल्याने घर भाड्याने देणेही कठीण झाले आहे.
कोरोनाच्या पावर्श्वभूमीवर अनेक छोटे-मोठे उद्योगधंदे बंद पडले. परिणामी मंदीचे वातावरण असल्याने अनेक उद्योग-व्यवसाय बंद आहेत. कामधंदाच नसल्याने अनेकांना मासिक घरभाडे भरणेही शक्य नाही. त्यामुळे ज्यांची भाड्याची घरे होती, त्यांनी ती खाली करून देत गाव गाठले. शहरासह विविध उपनगरांतील सदनिका सध्या पडून आहेत. त्यामुळे केवळ भाड्याने घरे देऊन उपजीविका करणाऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. दुसरीकडे नवीन भाडेकरूनंना घरात किंवा सोसायटीत प्रवेश करून देण्यास परिसरातील नागरिक विरोध करत असल्याने घर भाड्याने मिळणेही अवघड बनले आहे. एखाद्या सोसायटीतील फ्लॅट संबंधित मालकाने भाड्याने द्यायचा ठरविल्यास संबंधित सोसायटीतील पदाधिकाऱ्यांसह अन्य फ्लॅटधारकांकडून मोठा विरोध होत आहे. संबंधित व्यक्ती कोठूनही म्हणजे अगदी शेजारच्या इमारतीमधून आलेली असली तरी संबंधितांकडे फिटनेस सर्टिफिकेटची मागणी केली जात आहे.
दोन फ्लॅट असलेल्या नागरिकांनी उत्पन्नाचा भाग म्हणून ते भाड्याने दिले. परप्रांतीय नागरिक शहरातून निघून गेल्याने ते फ्लॅट रिकामे पडले आहेत. चंद्रपुरातील म्हाडा, तुकूम, दुर्गापूर, जटपुरा गेट, बालाजी वार्ड, बिनना गेट,बंगाली कॅम्प, इंदिरा नगर आदी या भागात खोल्याबांधून नवा धंदा तयार झाला आहे. परंतु कोरोनामुळे परिस्थिती बदलल्याने त्या मिळकती रिकाम्या पडल्या असून उत्पन्नाचे मार्ग बदं झाले आहे. सिस्टर कॉलनी परिसरातील एका कंपनीसाठी शेकडो आंध्रप्रदेशातील युवक किरायाने राहत होते. त्यामुळे या परिसरातील रुमचे दर मोठ्या प्रमाणात होते. मात्र लॉकडाऊनमुळे अनेकजण स्वगृही गेल्याने बहुतेक रुम खाली असून भाडेकरु मिळणे कठीण झाले आहे.