कोरोनाचा आलेख घसरतोय, मात्र नागरिकांची बेफिकिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:28 AM2021-05-09T04:28:40+5:302021-05-09T04:28:40+5:30
कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेनअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्याचे ...
कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेनअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्याचे वेळापत्रक जाहीर केले. सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंतच ही दुकाने सुरू असतात. परंतु, चंद्रपुरातील मुख्य मार्ग व चौकाचौकांत दिवसभर गर्दी असते. अत्यावश्यक कामाच्या नावाखाली विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या वाढली. पण, त्यांना अडविणारे कुणी नाही. बसस्थानकापासून तर गांधी चौक, गोल बाजारातील दुकाने, भाजी मार्केट परिसरात वस्तू खरेदी करणारे कमी मात्र विनाकारण गर्दी करणारेच दिसून येत आहेत. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली नागरिक असा गैरफायदा घेत असताना चंद्रपूर महानगरपालिका प्रशासन व पोलीस गप्प आहेत. कोरोना वाढू नये, म्हणून लागू केलेल्या संचारबंदीला कुणी जुमानत नसल्याचे शहरात चित्र आहे. असाच प्रकार कायम राहिल्यास गर्दीमुळे कोरोनाचा उद्रेक होण्याचा धोका आहे.
मोबाइल व्हॅनद्वारे करा रॅपिड अँटिजन टेस्ट
काहीही काम नसताना फिरणाऱ्यांची संख्या कोरोना संसर्गासाठी कारणीभूत ठरू शकते. यातून आरोग्य यंत्रणेवरील ताण पुन्हा वाढण्याचा धोका आहे. हॉस्पिटलमध्ये आधीच ऑक्सिजन बेड मिळत नाही. रुग्णसंख्या वाढली तर स्थिती हाताबाहेर जाऊ शकते. त्यामुळे विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची रस्त्यावरच अँटिजन टेस्ट करण्याचा आदेश चंद्रपूर मनपा प्रशासनाने जारी करावा, संबंधित व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्यास लगेच विलगीकरण कक्षात पाठविण्याची तंबी देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
‘त्या’ नागरिकांपासून घ्यावा धडा
चंद्रपूर शहर व अन्य तालुकास्थळी निर्बंध धाब्यावर ठेवण्याचे प्रकार सुरू असताना ग्रामीण भागातील नागरिक मात्र सार्वजनिक खबरदारीचे दर्शन घडवित आहेत. कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा फटका ग्रामीण भागातील नागरिकांनाच बसत आहे. शहराच्या तुलनेते पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ग्रामीण भागात जास्त आहे. त्यामुळे सरंपच, पोलीस, ग्रामपंचायतींचे सदस्य, महिला व पुरुष बचतगटातील नागरिकांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचे पालन करताना दिसतात. गावात विनाकारण फिरणाऱ्या तरुण मुलांना शेतीच्या कामात हातभार लावण्यास शिवारात घेऊन जात आहेत.
पोलीस यंत्रणा गेली कुठे?
राज्य सरकारने निर्बंध लागू केल्यानंतर नागरिकांकडून उल्लंघन होऊ नये, याकडे लक्ष देण्यासाठी पोलीस प्रशासनाने सुमारे तीन हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या. चंद्रपुरातही पहिल्या दिवशी नागरिकांची तपासणी करताना पोलीस दिसले. त्यामुळे सुरुवातीला घराबाहेर निघताना पोलीस तपासतील म्हणून मनात धास्ती वाटायची. मात्र, ती आता राहिली नाही, हेच गर्दीवरून जाणवू लागले आहे.