चंद्रपूर कारागृहात कोरोनाचा तांडव; १५०० कैद्यांसह ३० कर्मचाऱ्यांना बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2020 07:00 AM2020-09-04T07:00:00+5:302020-09-04T07:00:00+5:30
चंद्रपूर कारागृहातील एकूण १५० कैदी व ३० कर्मचारी पॉझिटिव्ह असल्याने कारागृह प्रशासन चांगलेच हादरले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात कोरोनाने कहर करणे सुरू केले आहे. प्रत्येक ठिकाणी कोरोना शिरकाव करीत आहे. जिल्हा कारागृहात यापूर्वी ७१ कैद्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली होती. कारागृहात कोरोना विषाणू गेलाच कसा, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित असतानाच पुन्हा कैदीबांधव कोरोनाबाधित झाल्याचे समोर आले आहे. आता कारागृहातील एकूण १५० कैदी व ३० कर्मचारी पॉझिटिव्ह असल्याने कारागृह प्रशासन चांगलेच हादरले आहे.
गुरुवारी जिल्ह्यात तब्बल नव्या २२२ कोरोना बाधितांची नोंद झाली असून कोरोना बाधितांची एकूण संख्या आता तीन हजार १६७ वर पोहोचली आहे. सध्या उपचार घेत असलेले एक हजार ६५६ बाधित आहेत. तर आतापर्यंत एक हजार ४७६ बाधित कोरोनातून बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. बाहेरून येणाºया नागरिकांनी चंद्रपूर शहरात शकुंतला लॉन तर जिल्ह्याच्या अन्य तालुक्याच्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयात जाऊन स्वत: आरोग्य तपासणी व नोंदणी करावी. जबाबदार नागरिक म्हणून बाहेरून आलेल्या प्रत्येक नागरिकांनी आपल्या नावाची नोंदणी व आरोग्य तपासणी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
गुरुवारच्या बाधितांमध्ये चंद्रपुरातील ११५, चिमूर तालुक्यातील चार, पोंभूर्णा तालुक्यातील तीन, बल्लारपूर सात, ब्रह्मपुरी पाच, भद्रावती सात, मूल पाच, राजुरा १०, वरोरा तालुक्यातील चार, सावली तालुक्यातील ४०, सिंदेवाही तालुक्यातील १०, कोरपना तालुक्यातील तीन, गोंडपिपरी तालुक्यातील नऊ असे एकूण २२२ बाधित पॉझिटिव्ह ठरले आहेत.
कारागृहातच कोविड सेंटर
जिल्हा कारागृहातील तब्बल १५० कैदी कोरोनाबाधित झाल्यामुळे चंद्रपुरातील जिल्हा कारागृहातच कोविड केअर सेंटरची उभारणी केली आहे. आरोग्य विभागाचे पथक या ठिकाणी नियुक्त करण्यात आले आहे. नवीन कैदी बांधवांना बाधा होऊ नये म्हणून तुकूम येथील एका आयटीआयमध्ये तात्पुरते करागृह केले आहे.