शाळाबाह्य मुलांच्या शोधमोहिमेत कोरोनाची बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:31 AM2021-03-09T04:31:11+5:302021-03-09T04:31:11+5:30
कोरोनामुळे यंदा शाळा भरल्याच नाही. परिणामी, शेकडो मुले शाळेत दाखल झाली नाही. अशा शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम १ ते १० ...
कोरोनामुळे यंदा शाळा भरल्याच नाही. परिणामी, शेकडो मुले शाळेत दाखल झाली नाही. अशा शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम १ ते १० मार्चपर्यंत शिक्षण विभागाने सुरू केली आहे. शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी शिक्षक दारोदार फिरत आहेत. या मोहिमेंतर्गत शिक्षकांना वीटभट्टी, रेल्वे फलाट, नवीन वस्त्या, रस्त्याच्या किनाऱ्यावर हंगामी मुक्कामी असलेले कुटुंब, गर्दीची ठिकाणे गाठून ३ ते १८ वर्षांतील शाळाबाह्य मुलांचा शोध घ्यायचा आहे. त्यानंतर, त्याच्या वयोमानानुसार त्याला जवळच्या शाळेत प्रवेशित करण्यात येणार आहे, परंतु कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने, शिक्षकांना शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यास मोठी अडचण जात आहे, तरीही कोरोनाच्या दहशतीमध्ये शिक्षक आपले कर्तव्य बजावत आहे. ७ मार्चपर्यंत जिल्ह्यातील शिक्षकांनी सुमारे ८९ शाळाबाह्य मुलांचा शोध लावून त्यांना जवळच्या शाळेमध्ये दाखल केले आहे.
बॉक्स
शिक्षकांची होतेय धावपळ
चंद्रपूर जिल्ह्यात परराज्यातून अनेक छोटे-मोठे विक्रेते वस्त्या तयार करून आहेत. अशा वस्त्यांचा शोध घेऊन पालकांना पाल्याला शाळेत पाठविण्याबाबत प्रवृत्त करणे शिक्षकाला मोठे जिकरीचे जात आहे. त्यामुळे शिक्षकांची मोठी धावपड होत आहे. कुटुंबाबाबत विचारपूस केल्यानंतर विलगीकरण कक्षात ठेवतील, या भीतीने माहिती देण्यास बहुतांश पालक शिक्षकांना टाळाटाळ करीत आहेत.
बॉक्स
बाल कल्याण विभागाचे सहकार्य
शाळाबाह्य मुलांच्या शोधमोहीम शिक्षकांसोबत बाल कल्याण विभागातील मदतनीस, पर्यवेक्षक व कर्मचारी सहकार्य करीत आहेत. ३ ते १८ वर्षे वयोगटांतील मुलांचा शोध घेण्यात येत आहे. ३ ते ६ वयोगटांतील शाळाबाह्य मुलांची नोंद बाल कल्याण विभागाकडे करण्यात येणार आहे.
कोट
२३ मार्चच्या शासन निर्णयानुसार, ३ ते १८ वर्षे वयोगटांतील शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम शिक्षकांच्या माध्यमातून, तसेच बाल कल्याण विभागातील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शोधमोहीम सुरू केली आहे. ७ मार्चपर्यंत जिल्ह्यात ८९ शाळाबाह्य मुले आढळून आली आहेत. त्या मुलांना त्यांच्या वयोगटांनुसार जवळच्या शाळेत दाखल केले जाणार आहे.
- दीपेंद्र लोखंडे, शिक्षणाधिकारी प्राथमिक, चंद्रपूर