कोरपना दिवाणी, फौजदारी न्यायालयाची प्रतीक्षा संपणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 11:38 PM2017-11-12T23:38:34+5:302017-11-12T23:38:54+5:30
कोरपना तालुका निर्माण होऊन २५ वर्षे लोटले. या ठिकाणी लोकन्याय दानाकरिता दिवाणी व फौजदारी न्यायालय सुरू व्हावे म्हणून भव्य अशा इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरपना : कोरपना तालुका निर्माण होऊन २५ वर्षे लोटले. या ठिकाणी लोकन्याय दानाकरिता दिवाणी व फौजदारी न्यायालय सुरू व्हावे म्हणून भव्य अशा इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. मात्र गेल्या दोन वर्षांपासून बांधकाम पूर्ण होऊनही इमारतीला उद्घाटनाची प्रतीक्षा आहे. मात्र आता ही प्रतीक्षा संपणार आहे.
आ. अॅड. संजय धोटे यांनी याबाबत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पाठपुरावा केल्याने २७ पदांच्या भरतीला लवकरच मंजूरी मिळणार आहे. कोरपना हा तेलंगणा सीमेवर टोकावर असलेला तालुका असून न्यायासाठी राजुरा येथे ५० ते ६० किमी प्रवास करून जावे लागत होते. यात वेळ व पैसा वाया जात होता. या करिता आ. अॅड. संजय धोटे यांनी ना. सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन कोरपना येथील न्यायालय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या २७ पदांंना वित्त विभागाकङून मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी केली. ना. मुनगंटीवार यांनी या पदांची मान्यता तातडीने देण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले आहे, असे जनसत्यागह संघटनेचे आबीद अली, रमेश मालेकर, प्रदिप पिपळशेंडे, किशोर बांधणे, विनोद जुमडे, नगरसेवक सुहेल अली, प्रल्हाद पवार, ताजणे, सोयाम आदींनी म्हटले आहे.