अखेर महानगरपालिकेने निविदा उघडल्या !
By admin | Published: November 23, 2015 01:04 AM2015-11-23T01:04:30+5:302015-11-23T01:04:30+5:30
कंत्राटदाराने केलेल्या कामाची गुणवत्ता निश्चित करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने काही ठोस पावले उचलल्याने ....
नवीन कंत्राटदारांंना संधी : कंत्राटदार असोसिएशनचा बहिष्कार झुगारला
चंद्रपूर : कंत्राटदाराने केलेल्या कामाची गुणवत्ता निश्चित करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने काही ठोस पावले उचलल्याने कात्रीत सापडलेल्या कंत्राटदारांनी एकवटून आपल्या काही मागण्या पुढे केल्या आणि मागण्या मान्य होत नाही म्हणून शनिवारी उघडण्यात आलेल्या ५५ निविदांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. मात्र, कंत्राटदार असोसिएशनचा बहिष्कार झुगारुन मनपा प्रशासनाने निविदा उघडल्या. जवळपास ५० निविदा मंजूर झाल्याचे मनपा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
महानगरपालिका क्षेत्रातील रस्ते विकासाची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची होत असल्याचे लक्षात आल्यावरुन मनपा प्रशासनाने या विरोधात कडक धोरण राबविण्याचा संकल्प केला आहे. केलेल्या कामाची जबाबदारी दोन वर्षापर्यंत कंत्राटदारांचीच राहील, अशी ताठर भूमिका घेतल्यामुळे अनेक कंत्राटदारांना ही बाब खटकली. तसेच निकृष्ठ कामे करणाऱ्या कंत्राटदारांवर दंड ठोठावून त्यांना काळ्या यादीत टाकण्याची तयारी मनपा प्रशासनाने केली आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाविरोधात बहिष्काराचे शस्त्र उगारुन दबाव टाकण्याचा प्रयत्न कंत्राटदार असोसिएशनने केला. मात्र, मनपा कंत्राटदार असोसिएशनच्या बहिष्काराचा शनिवारच्या निविदांवर कोणताही परिणाम झाला नाही. ५५ कामांच्या निविदा उघडण्यात आल्या. यापैकी जवळपास ५० कामांच्या निविदा मंजूर केल्याचे मनपा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. कंत्राटदार असोसिएशनमधील सहा-सात कंत्राटदारांकडे प्रत्येकी सात ते आठ कोटी रुपये किमतीची कामे आहेत. कोणत्याही कंत्राटदाराची बिले अडविण्यात आलेली नाही. ज्यांची कामे निकृष्ट दर्जाची दिसून आली, त्यांचीच बिले अडविण्यात आली आहेत. निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्यांची बिले अडविणे ही बाब नियमाला धरुनच आहे. त्यामुळे कंत्राटदरांच्या दबावाला बळी न पडता निविदा उघडण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला. काही मोजक्या कंत्राटदारांनी दबाव तंत्राचा वापर केल्याने त्यानिमित्ताने काही नवीन आणि गरजू कंत्राटदारांना कामे मिळाल्याचे समाधान आहे, असेही काहींचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर आता महानगरपालिकेत कंत्राटदार असोसिएशनविरुद्ध प्रशासन असे चित्र राहणार आहे. (शहर प्रतिनिधी)