‘श्री’च्या उत्सवासाठी मनपा सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 12:39 AM2019-08-30T00:39:15+5:302019-08-30T00:40:39+5:30
मूर्ती आणि सजावटींमध्ये 'पीओपी'चा वापर मोठया प्रमाणात होतो, मात्र, 'पीओपी' पुन्हा वापरता येत नसल्याने प्रदूषणाची शक्यता नाकारता येत नाही. 'पीओपी'चा वापर घरगुती सजावट, भव्य सेट्सची उभारणी आणि मूर्ती तयार करण्यासाठी होतो. 'पीओपी'च्या मूर्ती पाण्यात विरघळत नाहीत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : २ सप्टेबरपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेनेही आपली तयारी पूर्ण केली आहे. शहरातील विसर्जन घाट, कृत्रिम तलाव, निर्माल्य कुंड, रस्त्यांची डागडुजी आदी कामे पूर्ण केली आहेत. दरम्यान, या उत्सवात जल व ध्वनी प्रदूषण होऊ नये, शांतता व सुव्यवस्थेला बाधा पोहचू नये, या पार्श्वभूमीवर आज गुरुवारी मूर्तीकार, मूर्ती विक्रेते व गणेश मंडळांचे पदाधिकारी यांची एक बैठक घेत त्यांना मनपा प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या.
याप्रसंगी गणेशोत्सवादरम्यान प्लास्टर आॅफ पॅरिस निर्मित मूर्ती संबंधाने उपाययोजना करणे, ध्वनी प्रदूषण नियंत्रण, मंडप उभारणे, सजावट करणे, मूर्ती विसर्जनासंबंधी मार्गदर्शक तत्वांवर चर्चा करण्यात आली.
मूर्ती आणि सजावटींमध्ये 'पीओपी'चा वापर मोठया प्रमाणात होतो, मात्र, 'पीओपी' पुन्हा वापरता येत नसल्याने प्रदूषणाची शक्यता नाकारता येत नाही. 'पीओपी'चा वापर घरगुती सजावट, भव्य सेट्सची उभारणी आणि मूर्ती तयार करण्यासाठी होतो. 'पीओपी'च्या मूर्ती पाण्यात विरघळत नाहीत. त्यामुळे जलप्रदूषणात वाढ होऊन जलचर प्राण्यांसह वनस्पतींनाही धोका पोहोचतो. त्यामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शहरातील सर्व गणेश मंडळांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी मनपा आयुक्त संजय काकडे यांनी केले. यावेळी महानगरपालिकेतील सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी व गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावातच करा
मागील वर्षीच्या आकडेवारीनुसार शहरातील ९० टक्क्यांपेक्षा ज्यास्त मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच झाले होते. यंदा १०० टक्के मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच व्हावे, यासाठी मनपा प्रयत्नशील आहे. पाच ते साडेपाच फुटापर्यंतची मूर्तीसुद्धा आता कृत्रिम तलावातच विसर्जित करण्यात येणार आहे. कृत्रिम तलावात दर १ ते २ तासांनी विरघळणारी माती बाहेर काढण्यात येते. त्यामुळे मोठया मूर्तींचे विसर्जन योग्यप्रकारे होण्यास अडचण निर्माण होत नाही. याकरिता कृत्रिम तलावांची उंची वाढविण्यात आलेली आहे. कृत्रिम तलाव वापरास प्रोत्साहन म्हणून मनपातर्फे नागरिकांना प्रमाणपत्र देण्यात येते. मागील वर्षी १९ कृत्रिम तलाव निर्माण करण्यात आले होते. यावर्षी आवश्यकतेनुसार अधिक तलावांची निर्मिती करण्यात येणार आहे.
देखाव्यात प्लास्टिक, थर्माकॉल टाळावे
मंडळांनी गणेश सजावट व देखावे तयार करताना प्लास्टिक व थर्माकॉलचा वापर टाळावा. गणेशोत्सव काळात प्लस्टिकचा कचरा तयार होणार नाही, याचीही दक्षता घ्यावी. पर्यारवण रक्षणाची जबाबदारी प्रत्येकानेच स्वीकारायला हवी. प्रत्येक घरातून याची दक्षता घेतली गेल्यास इको प्रेंडली गणेशोत्सव साजरा व्हायला मदत होईल.
स्वस्त दरात वीज पुरवठा
गणेश मंडळांनी स्थापनेसाठी मनपाकडून रितसर परवानगी घेणे आवश्यक आहे. शहरातील गणेश मंडळांनी विद्युत खांबावरून अनधिकृतरित्या वीज पुरवठा घेऊ नये. विद्युत जोडणीसाठी स्वस्त दरात तात्पुरते वीज कनेक्शन महावितरण कंपनीने उपलब्ध करून दिले जात आहे. गणेश मंडळांनी त्याचा लाभ घ्यावा.