माझी वसुंधरा अभियानात मनपा मिळविणार दीडहजार गुण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:33 AM2021-01-08T05:33:55+5:302021-01-08T05:33:55+5:30
विविध उपक्रमांचा आढावा : अभियान प्रभावीपणे राबविण्याचे आयुक्तांचे निर्देश चंद्रपूर : सद्यस्थितीत पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या ...
विविध उपक्रमांचा आढावा : अभियान प्रभावीपणे राबविण्याचे आयुक्तांचे निर्देश
चंद्रपूर : सद्यस्थितीत पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वासोबत जीवनपद्धती अंगीकारणे गरजेचे आहे. या पंचतत्त्वावर आधारित माझी वसुंधरा हे अभियान चंद्रपूर महानगर पालिकातंर्गत राबविण्यात येत आहे. अभियानात अव्वल येण्यासाठी विविध उपक्रम सुरू आहेत.
आयुक्त राजेश मोहिते यांनी बुधवारी विविध उपक्रमांचा आढावा घेऊन मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या.
राज्याच्या पर्यावरण विभागामार्फत माझी वसुंधरा अभियान राबविण्याचे सरकारचे निर्देश आहेत. त्यामुळे मनपातर्फे विविध उपक्रमांची सुरुवात करण्यात आली. लवकरच विविध स्पर्धा, सायक्लोथॉन, स्वच्छता ड्राईव्ह असे नवनवीन उपक्रम घेतले जाणार आहेत.
पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वावर आधारित पर्यावरण संतुलन व रक्षण करणे हा माझी वसुंधरा अभियानाचा उद्देश आहे. या अभियानाचे मूल्यमापन होणार असून यासाठी विविध वर्गवारीत १५०० गुण आहेत. त्यामध्ये पृथ्वी ६०० गुण, वायू १०० गुण, जल ४०० गुण, अग्नी १०० गुण, आकाश ३०० गुणांचा समावेश आहे. जल पंचतत्त्वानुसार तलाव संवर्धन, जैवविविधतेचे जतन, जलस्रोतांचे संरक्षण व संवर्धन, तलावांसह सार्वजनिक विहिरींची स्वच्छता, रेनवॉटर हार्वेस्टिंग असे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. अग्नी तत्त्वांनुसार ऊर्जेचा परिणामकारक वापर व बचत, अपारंपरिक ऊर्जानिर्मिती, बायोगॅस प्रकल्प, सौरऊर्जेवर एलईडी दिवे लावण्याचे नियोजन, वीज वाहनाकरिता चार्जिंग पाईंट निर्माण आदी कामे केली जाणार आहेत. यावेळी सहायक आयुक्त विद्या पाटील, हजारे, आशिष मोरे, सर्व विभागप्रमुख व स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते.