मनपाची पाणीपुरवठा योजना तब्बल सहा कोटींनी ताेट्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2022 05:00 AM2022-04-07T05:00:00+5:302022-04-07T05:00:37+5:30
शहरात आजघडीला ८५ हजार मालमत्ता असल्या, तरी केवळ ३५ हजार नळ जोडणी आहेत. इरई धरण तथा दाताळा मार्गावरील इरई नदी या दोन ठिकाणांतून शहराला पाणीपुरवठा होतो. त्यात या योजनेचे खासगीकरण करून कंपनीला ही योजना चालविण्यासाठी दिली होती. अगदी सुरुवातीला ठाकूर नावाच्या व्यक्तीच्या कंपनीला ही योजना संचालित करण्याचे काम दिले होते. त्यानंतर, चांडक यांच्या कंपनीच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजना संचालित केली जात होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शहरातील पाणीपुरवठा योजनेवर महापालिका वर्षभरात ११ कोटींचा खर्च करते. मात्र, पाणी कराच्या माेबदल्यात केवळ ४ कोटी ९५ लाखांचे उत्पन्न होत आहे. त्यामुळे वर्षभरात तब्बल सहा कोटींचा फटका बसत असल्याचे वास्तव पुढे आले आहे.
चंद्रपुरात अमृत पाणीपुरवठा योजनेचे थाटात उद्घाटन झाले असले, तरी बऱ्याच प्रभागातील कामे अर्धवट तर कुठे सुरू आहेत. अजूनही अनेकांना अमृत योजनेचे पाणी मिळाले नाही. आगामी निवडणुका डोळ्यांपुढे ठेवून उद्घाटन करण्यात आले, हे आता पुरते स्पष्ट झाले आहे.
त्यामुळे ज्या प्रभागात अमृत योजनेचे पाणी पोहोचले नाही, तेथील नागरिक मनपा पदाधिकाऱ्यांना प्रश्न विचारून जेरीस आणत आहेत. शहरात आजघडीला ८५ हजार मालमत्ता असल्या, तरी केवळ ३५ हजार नळ जोडणी आहेत. इरई धरण तथा दाताळा मार्गावरील इरई नदी या दोन ठिकाणांतून शहराला पाणीपुरवठा होतो. त्यात या योजनेचे खासगीकरण करून कंपनीला ही योजना चालविण्यासाठी दिली होती. अगदी सुरुवातीला ठाकूर नावाच्या व्यक्तीच्या कंपनीला ही योजना संचालित करण्याचे काम दिले होते. त्यानंतर, चांडक यांच्या कंपनीच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजना संचालित केली जात होती.
या दोन्ही कंपन्यांकडून काम काढून घेतल्यानंतर, समरित यांच्या कंपनीकडे शहराच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी सोपविली होती. मात्र, या तिन्ही कंपन्यांमुळे मनपाला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला, असा पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे.
खासगीकरण रद्द होऊनही समस्या जैसे थे
चंद्रपूरकरांना पाणी नियमित मिळावे, यासाठी मनपाच्या आमसभेत पाणीपुरवठा योजनेच्या खासगीकरणाचा निर्णय रद्द करून, योजना स्वत: चालविण्याचा निर्णय घेतला. या घटनेला दोन वर्षे झाले. आता मनपा स्वत:च पाणीपुरवठा योजना संचालित करीत आहे. मात्र, चंद्रपूरकरांची पाण्यासाठी भटकंती संपली नाही.
पाणीपुरवठा एक दिवसाआड
काही दिवसांपूर्वी दररोज दोनदा नळाला पाणी येत होते. आता तर एक दिवस आड पाणीपुरवठा केला जातो. तोही नियमित नसल्याने घरातील घागरी रिकाम्या असतात. इरई धरणातून चंद्रपूरकडे येणारा पाइपलाइन फुटल्याने तीन दिवस पाणीपुरवठा ठप्प होता.
तोटा भरून काढण्याकडे दुर्लक्ष
- पाणीपुरवठा योजनेवरील खर्चाच्या तुलनेत उत्पन्न कमी असल्याने वर्षाकाठी सहा कोटींचा तोटा होत आहे.
- हा तोटा भरून काढण्यासाठी मनपाने काही उपाययोजनाच केल्या नाही. त्यामुळे ही समस्या कायम असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.