शहरातील अमृत योजनेवरून नगरसेवक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 11:30 PM2018-11-30T23:30:59+5:302018-11-30T23:31:42+5:30

शहरात सर्वत्र रस्त्यांचे खोदकाम करून जनजीवन विस्कळीत करून ठेवणाऱ्या अमृत पाणीपुरवठा योजनेच्या कंत्राटदारावर गुरूवारी पार पडलेल्या आमसभेत सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी प्रश्नांची सरबत्ती केली. स्वपक्षीय महापौर अंजली घोटेकर, सभापती राहुल पावडे यांची उलटतपासणी घेताना दीड वर्षापासून कंत्राटदार मनमानी पद्धतीने काम आहात, असा प्रश्न केला.

Corporator Akramak from Amrit Yojna in the city | शहरातील अमृत योजनेवरून नगरसेवक आक्रमक

शहरातील अमृत योजनेवरून नगरसेवक आक्रमक

googlenewsNext
ठळक मुद्देमनपाची आमसभा वादळी : पाईपलाईनकरिता विविध वॉर्डांमध्ये खड्डे खोदल्याने नागरिक त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शहरात सर्वत्र रस्त्यांचे खोदकाम करून जनजीवन विस्कळीत करून ठेवणाऱ्या अमृत पाणीपुरवठा योजनेच्या कंत्राटदारावर गुरूवारी पार पडलेल्या आमसभेत सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी प्रश्नांची सरबत्ती केली. स्वपक्षीय महापौर अंजली घोटेकर, सभापती राहुल पावडे यांची उलटतपासणी घेताना दीड वर्षापासून कंत्राटदार मनमानी पद्धतीने काम आहात, असा प्रश्न केला. कंत्राटदाराच्या कामात सुधारणा झाली नाही तर काळया यादीत टाकण्याची मागणी केली. अमृत योजनेवरून सभागृहात भाजप नगरसेवक विरुद्ध पदाधिकारी असेच चित्र बघायला मिळाले.
महापालिकेची सभा सुरू होताच सत्ताधारी भाजप व विरोधी काँग्रेसच्या नगरसेवकांनी अमृत पाणीपुरवठ्याच्या विषयावर सभागृहात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. विषय सुचीवरील विषयांवर चर्चा झाल्यानंतर महापौर अंजली घोटेकर यांनी शेवटी अमृतचा विषय चर्चेला घेतला. यावेळी अमृतचे कंत्राटदार संतोष कन्स्ट्रक्शन कंपनी (नांदेड) चे संचालक संतोष मुरकुटे यांनाच आमसभेत हजर केले. कंत्राटदार बोलण्यास सुरुवात करताच भाजप नगरसेवक संजय कंचर्लावार, सुभाष कासनगोट्टूवार, रवी आसवानी, शिवसेनाचे सुरेश पचारे, मनसेचे भोयर यांनी दीड वर्षांपासून शहरातील नागरिकांना दूषित पाणीपुरवठा करत असल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन कंत्राटदाराचे स्वागत केले. सर्वच भाजप तथा काँग्रेस नगरसेवकांनी शहरात ठिकठिकाणी खोदून ठेवलेल्या सिमेंट व डांबरी रस्त्यासोबत नळजोडणी, फोन वायर, अपघात व खड्डे याबद्दल कंत्राटदारावर प्रश्नांचा भडीमार करत सुनावले. काम होत नसेल तर काळ्या यादीत टाका व दंड आकारा, अशीही मागणी भाजप नगरसेवकांनी केली.
यावेळी कंत्राटदार मुरकुटे यांनी नगरसेवकांना सहकार्य करण्याची विनंती करतानाच जीएसटीमुळे सात कोटी तर पाईप आणि विविध साहित्याची किंमत वाढल्याने १५ कोटींचे आर्थिक नुकसान होत आहे, असे सांगितले. अशाही स्थितीत शहरातील पाण्याच्या आठ टाक्या, पाईप लाईन व आरसीसी काम वेगात सुरू आहे. यवतमाळ व अमरावती येथील काम बंद पडले असून केवळ चंद्रपुरातच वेळेत काम सुरू आहे. थोडा त्रास सहन करा, पण सहकार्य करण्याची विनंती केली.
भाजप नगरसेवक कंत्राटदाराला आगपाखड करत असताना महापौर व सभापती मध्येच प्रश्न उपस्थित करत होते. यावेळी भाजप नगरसेवकांनी दोन्ही पदाधिकाºयांना कंत्राटदार दीड वर्षापासून ऐकत नव्हता तेव्हा कुठे होता, आता कंत्राटदाराला आम्हालाच सुनावू द्या, असे म्हणून पदाधिकाºयांनाच सुनावले. नगरसेवक नंदू नागरकर, सुनीता लोढीया, अमजद यांनी भाजप व कंत्राटदाराची मिली भगत असल्याचा आरोप केला. त्यामुळेच कंत्राटदारावर आजपर्यंत दंड आकारण्यात आला नाही अशी ओरड केली. नगरसेवक आसवानी व दीपक जयस्वाल यांनी कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचा ठराव घेण्याची मागणी लावून धरली. शहरात पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम सुरू आहे. खोदकाम झाल्यानंतर बाहेर निघालेली माती व्यवस्थित केली जात नाही. त्यामुळे नागरिकांचे या सभेकडे लक्ष लागले होते.
आठवडाभरात नळ जोडणीचे आश्वासन
मनपाच्या मासिक सभेत अमृत पाणी पुरवठा योजनेचाच विषय सर्वाधिक गाजला. कंत्राटदारासोबतच महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाचे अधिकारी वाघ यांनीही कंत्राटदार सहकार्य करत नसल्याचे सांगतानाच १५ दिवसांत शहरातील नळ जोडणी व इतर कामे सुव्यवस्थित करण्याचे आश्वासन मनपा सभागृहात दिले.

Web Title: Corporator Akramak from Amrit Yojna in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.