‘ती’ अंगठी शोधू लागले नगरसेवक आणि सभापतीही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2021 09:00 PM2021-09-20T21:00:32+5:302021-09-20T21:01:19+5:30
Chandrapur News अनावधानाने ७ ग्रॅम सोन्याची अंगठी घरचा कचरा घंटागाडीत टाकत असताना गाडीत पडली. काही वेळाने ही बाब लक्षात आल्यानंतर शोधाशोध केली असता, ती परत मिळाली आणि घरातील सर्वांनीच समाधानाचा सुस्कारा सोडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : अनावधानाने ७ ग्रॅम सोन्याची अंगठी घरचा कचरा घंटागाडीत टाकत असताना गाडीत पडली. काही वेळाने ही बाब लक्षात आल्यानंतर शोधाशोध केली असता, ती परत मिळाली आणि घरातील सर्वांनीच समाधानाचा सुस्कारा सोडला.
नागभीड नगरपरिषदेंतर्गत नगरपरिषदेच्या सर्व आठही प्रभागांतून ओला आणि सुका कचरा घंटागाड्यांमार्फत दररोज गोळा केल्या जाते. अशाच प्रकारे कचरा गोळा करीत असताना घंटागाडी पंचायत समिती प्रभागात आली. राकेश खरवडे यांची आई घरचा कचरा गाडीत टाकत असताना, त्यांच्या बोटातील अंगठीही कचऱ्यासोबत घंटागाडीत पडली.
काही वेळानंतर ही बाब राकेश यांच्या आईच्या लक्षात आली. क्षणभर धक्काच बसला. लगेच ही बाब त्यांनी मुलगा राकेशला सांगितली. राकेशने नगरपरिषदेचे बांधकाम सभापती सचिन आकुलवार यांना सांगितली. आकुलवार यांनी लागलीच डम्पिंग ग्राउंड गाठून कचरा गाडीतील कचरा पूर्णपणे खाली करून शोध घेण्याच्या सूचना दिल्या. घंटागाडी चालक श्रावण कासार व वाहक गंगाधर बागडे यांनी गाडीतील कचरा वेगवेगळा करून शोध घेऊ लागले. काही वेळातच ही ७ ग्राम वजनाची अंगठी मिळाली. लगेच ही अंगठी बांधकाम सभापती सचिन आकुलवर व नगरसेवक दशरथ उके यांच्या समक्ष खरवडे कुटुंबीयांना परत करण्यात आली. तेव्हा खरवडे कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर समाधानाचे वेगळेच भाव झळकत होते.