निधी वाटपावरून नगरसेवकांमध्ये बिनसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 11:50 PM2018-01-18T23:50:34+5:302018-01-18T23:50:45+5:30

मनपाला नगरोत्थान व दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत निधी मिळाला. मात्र मनपाच्या पदाधिकाऱ्यांनी तो आपल्याच प्रभागात देत इतर प्रभागाला डावलले. पदाधिकाऱ्यांच्या या प्रकारामुळे नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

Corporators from the allocation of funds are unemployed | निधी वाटपावरून नगरसेवकांमध्ये बिनसले

निधी वाटपावरून नगरसेवकांमध्ये बिनसले

Next
ठळक मुद्देज्येष्ठांची घेणार भेट : नगरोत्थानचा निधी पदाधिकाऱ्यांच्याच प्रभागात

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मनपाला नगरोत्थान व दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत निधी मिळाला. मात्र मनपाच्या पदाधिकाऱ्यांनी तो आपल्याच प्रभागात देत इतर प्रभागाला डावलले. पदाधिकाऱ्यांच्या या प्रकारामुळे नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. यात विरोधकांसह सत्ताधारी भाजप नगरसेवकांचाही समावेश असून या नगरसेवकांनी गुरुवारी याबाबत जाब विचारण्यासाठी मनपात धडक दिली.
शहरातील विविध प्रभागाच्या विकासासाठी शासनाकडून नगरोत्थान व दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत निधी दिला जातो. २०१७-१८ या वर्षासाठीदेखील शासनाकडून मनपाला नगरोत्थान व दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत कोट्यवधींचा निधी प्राप्त झाला आहे. मात्र हा निधी वाटप करताना मनपाच्या सत्तारुढ पदाधिकाऱ्यांनी भेदभाव केल्याचा आरोप आहे. शहरातील अनेक प्रभागातील वस्त्यांमधील अनेक कामे प्रलंबित आहे. तेथील नागरिकांच्या समस्या अजूनही कायम आहेत. मात्र २०१७-१८ मध्येही या वस्त्यांच्या विकासासाठी निधी देण्यात आलेला नाही.
मनपा पदाधिकाऱ्यांच्या या सापत्न वागणुकीमुळे विरोधकांसह सत्ताधारी भाजपाच्याही काही नगरसेवकांमध्ये सध्या तीव्र नाराजी पसरली आहे.
नगरोत्थानचा निधी देताना आमच्या प्रभागाला का डावलण्यात आले, याबाबतचा जाब विचारण्यासाठी सोमवारी बसपा, शिवसेना, मनसे, राष्टÑवादी काँग्रेस व सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकांनी महापालिकेत धडक दिली. यात भाजपा नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, रवी आसवानी, शिवसेनेचे सुरेश पचारे, बसपाचे अनिल रामटेके, कश्यप, नगरसेविका मून, मनसेचे सचिन भोयर, दिलीप रामेडवार, विशाल निंबाळकर, अजय सरकार आदींचा समावेश होता.
सर्व नाराज नगरसेवक मनपात गेले; मात्र महापौर अंजली घोटेकर या उपस्थित नव्हत्या. त्यामुळे त्यांनी आपला मोर्चा उपमहापौर अनिल फुलझेले यांच्या कक्षाकडे वळविला. उपमहापौरांसमोर सर्वांनी आपली नाराजी व्यक्त करीत निधी वाटपात भेदभाव करू नये, अशा मागणीचे निवेदन दिले.
फुलझेले आणि कासनगोट्टूवार यांच्यात जुंपली
नगरोत्थानचा निधी वाटप करताना भाजपाचेच नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांच्या प्रभागात निधी दिला नाही. त्यामुळे विकासकामांसाठी प्रभागाला निधी द्यावा, या मागणीचे निवेदन द्यायला उपमहापौर अनिल फुलझेले यांच्या कक्षात गेले. यादरम्यान कासनगोट्टूवार आणि फुलझेले यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. वाद एवढा वाढला की प्रकरण हातापायीवर येऊ लागले. त्यामुळे नगरसेवक सचिन भोयर यांनी वेळीच मध्यस्थी केल्यामुळे वाद तेथेच निवळला.
नगरसेवकांच्या कक्षात बैठक
उपमहापौर यांना निवेदन दिल्यानंतर मनपामधील नगरसेवकांच्या कक्षामध्ये सर्व नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीत पुढे काय करायचे, याबाबत विचारविनिमय करण्यात आला. मनपा पदाधिकाऱ्यांकडून विकास निधी वाटप करताना भेदभाव केला जात असल्याने याबाबत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, ना. हंसराज अहीर, आ. नाना श्यामकुळे यांना भेट निवेदन दिले जाणार आहे.

Web Title: Corporators from the allocation of funds are unemployed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.