घोडाझरी उपकालव्याची किंमत २ हजार २१८ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:31 AM2021-03-01T04:31:48+5:302021-03-01T04:31:48+5:30
नागभीड : तालुक्यातून गेलेल्या ५५ किमी लांबी असलेल्या गोसेखुर्द प्रकल्पाच्या घोडाझरी उपकालव्याची किंमत २ हजार २१८ कोटीच्या घरात ...
नागभीड : तालुक्यातून गेलेल्या ५५ किमी लांबी असलेल्या गोसेखुर्द प्रकल्पाच्या घोडाझरी उपकालव्याची किंमत २ हजार २१८ कोटीच्या घरात गेली आहे. काम कासव गतीने सुरू आहे. १२ वर्षांपासून या कालव्याचे काम सुरू असले तरी अद्यापही बरेच काम शिल्लक आहे.
गोसेखुर्द प्रकल्पाच्या घोडाझरी उपकालव्याला २३ जून २००६ रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली. काही दिवसातच कामही सुरू झाले. हा उपकालवा नागभीड तालुक्यातून भूमिगत स्वरूपात गेला आहे. त्यामुळे या कालव्याचा तालुक्याला फायदा काहीच नाही. उलटपक्षी या कालव्याच्या रूपाने मृत्यूचे दरवाजे आणि मातीचे ढिगारे तालुक्याच्या नशिबी आले आहेत.
नागभीड तालुक्यातून घोडाझरी उपकालवा गेला आहे. १२ वर्षांपूर्वी या उपकालव्याच्या कामाला सुरुवात झाली. मात्र आजही काम अर्धवटच आहे. नागभीड तालुक्यातील पान्होळी, मेंढा, किरमिटी, नवेगाव पांडव, कोदेपार येथून हा कालवा गेला असून, कालव्यातून निघालेल्या मातीची विल्हेवाट लावण्यासाठी ठिकठिकाणी मातीचे डोंगर तयार करण्यात आले आहेत. शेतात मातीचे डोंगर तयार झाल्याने शेकडो एकर जमीन नापिकी झाली आहे. एवढेच नव्हे तर या अर्धवट कालव्याच्या रूपाने शासनाने तालुक्यातील लोकांसाठी मृत्यूचे दरवाजे उघडून दिले आहेत, अशी जनभावना होत आहे. गेल्या आठ-दहा वर्षांत तालुक्यातील नवेगाव पांडव येथे ५ आणि मौशी येथे ३ अशा ८ घटनांनी हेच आधोरेखित झाले आहे.
असे असले तरी नागभीड तालुक्याला या कालव्याचा म्हणा किंवा प्रकल्पाचा म्हणा कोणताच फायदा नाही. मौशीपासून तर बाळापूरपर्यंत पसरलेली गावे या प्रकल्पाच्या सिंचनापासून तांत्रिक कारणामुळे वगळण्यात आली आहेत.