महामार्गावर वाहनाचा वेग वाढविल्याची किंमत साडेअकरा लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:32 AM2021-09-12T04:32:00+5:302021-09-12T04:32:00+5:30
सुसाट वाहने पळविणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडे स्पीडगन व्हॅन आहे. या व्हॅनमुळे धावत्या गाडीचा वेग मोजण्याची प्रक्रिया सोपी झाली ...
सुसाट वाहने पळविणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडे स्पीडगन व्हॅन आहे. या व्हॅनमुळे धावत्या गाडीचा वेग मोजण्याची प्रक्रिया सोपी झाली आहे. साधारणत: दुचाकीचा वेग ६० व चारचाकीचा वेग ९० तर, टू लेनसाठी चारचाकीचा वेग ७० तर, दुचाकीचा वेग ६० ठेवण्यात आला आहे. मात्र अनेक वाहनचालक यापेक्षा अधिक वेगाने वाहन पळवितात. अशांवर वाहतूक पोलीस कारवाई करतात. जानेवारी ते ऑगस्ट २०२१ या आठ महिन्यांच्या कालावधीत वाहतूक पोलिसांनी ११५६ जणांवर कारवाई करून प्रत्येकी हजार रुपये याप्रमाणे ११ लाख ५६ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. यामध्ये मार्च महिन्यात सर्वाधिक २२० वाहनचालकांवर कारवाई करून दोन लाख २० हजार त्यानंतर जून महिन्यात १७६ वाहनचालकांवर एक लाख ७६ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. ही कारवाई वाहतूक पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस हेड कॉन्स्टेबल विष्णू नागरगोजे, पोलीस कॉन्स्टेबल संदीप जाधव यासह वाहतूक पोलिसांच्या चमूंनी केली.
बॉक्स
धावत्या गाडीचा मोजला जातो वेग
ओव्हरस्पीड धावणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांना शासनाने इंटरसेप्टर प्रणाली असलेले स्पीडगन व्हॅन हे चार वाहन दिले आहे. दुचाकीचा वेग ६० व चारचाकीचा वेग ९० तर टू लेनसाठी चारचाकीचा वेग ७० तर दुचाकीचा वेग ६० ठरवून देण्यात आला आहे. स्पीडगनने वेग मोजला जातो.
बॉक्स
एसएमएसवर मिळते पावती
महामार्गावर सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांचा पाठलाग करून दंड वसूल करणे कठीण काम आहे. त्यामुळे स्पीडगनने कारवाई केल्यानंतर दंडाच्या रक्कमेची पावती एसएमएसद्वारे पाठविण्यात येते. त्यास वाहनचालकांकडून अपेक्षित प्रतिसादही मिळत असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे.
कोट
पावसामुळे रस्त्यावर खड्डे तयार झाले आहेत. तसेच गतिरोधकावरील पट्टे नाहीसे झाले आहेत. वाहन वेगात असेल तर ते चालकाच्या लक्षात येत नाही. अशावेळेस अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे स्वत:च्या आणि इतरांच्या जीविताला धोका होण्याची शक्यता असते. त्यामुळे वाहनाचा वेग हा नियंत्रितच असणे गरजेचे आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे.
-प्रवीणकुमार पाटील, वाहतूक पोलीस निरीक्षक
बॉक्स
महामार्गावर कोणत्या महिन्यात किती दंड
महिना दंड रुपयात
जानेवारी १४३०००
फेब्रुवारी १६४०००
मार्च २२००००
मे ५८०००
जून १७६०००
जुलै १३१०००
ऑगस्ट १६५०००