घरकूल योजनेतून कोठारीला डावलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 11:13 PM2018-03-27T23:13:58+5:302018-03-27T23:13:58+5:30
बल्लारपूर पंचायत समिती अंतर्गत रमाई घरकूल योजनेपासून कोठारी ग्रामपंचायतीला वगळल्याने अनुसूचित जातीच्या पात्र नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
आॅनलाईन लोकमत
कोठारी: बल्लारपूर पंचायत समिती अंतर्गत रमाई घरकूल योजनेपासून कोठारी ग्रामपंचायतीला वगळल्याने अनुसूचित जातीच्या पात्र नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. हा अन्याय दूर केला नाही तर आंदोलन करू, असा इशारा सरपंच मोरेश्वर लोहे व ग्रा.पं. सदस्य अमोल कातकर यांनी दिला आहे.
सन २०१७-१८ या वर्षाकरिता कोठारी ग्रा. पं कडून रमाई घरकूल योजनेचे प्रस्ताव मागविले होते. ग्रा.पं. ने ठराव घेवून २५२ लाभार्थ्यांची यादी १ जानेवारी २०१८ ला पं.स.कडे पाठविण्यात आली. पंचायात समितीने प्राप्त यादीतील साठ घरकुलांना मंजुरी दिली. मंजूर गावांच्या यादीत कोठारीला वगळण्यात आले. अनुसूचित जातीतील एकाही लाभार्थ्यांला घरकूल यादीत स्थान मिळाले नाही. अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र नागरिक घरकूलसाठी प्रतीक्षा करीत आहे. त्यामुळे पंचायत समितीचे अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांना हेतुपुरस्सर वंचित ठेवले, असा आरोप पात्र नागरिकांनी केला आहे.
रमाई घरकुलचा लाभ घेण्यासाठी शासनाने निकष तयार केले आहेत. या निकषात कोठारी येथील अनुसूचित जातीचे नागरिक पात्र ठरतात. या सर्व नागरिकांची आर्थिक परिस्थिती अतिशय वाईट आहे. स्वबळावर घर बांधू शकत नाही. त्यामुळे शासकीय योजनेतून घर मिळेल, याकडे त्यांचे लक्ष होते. यासाठी ग्रामपंचायतीकडे सर्व पुरावे सादर केले. ग्रामसभा घेवून ठरावही पारीत करण्यात आला. हा ठराव पंचायत समितीला सादर केल्यानंतर संबंधित अधिकाºयांनी बल्लारपूर तालुक्यासाठी केवळ ६० घरकूल मंजूर केले. चुकीच्या मानसिकतेमुळे कोठारी येथील पात्र नागरिकांवर अन्याय झाला आहे. या घटनेची चौकशी करून पात्र नागरिकांना घरकूल मिळवून द्यावी, अशी मागणी केली जात आहे.
ग्रामसभेच्या ठरावाला वाटाण्याच्या अक्षता
बल्लारपूर पं.स. अंतर्गत रमाई घरकूल योजनेच्या लाभापासून कोठारी येथील गरजू लाभार्थ्यांना वंचित ठेवण्यात आले. पंचायत समितीने निकषांचे पालन केले नाही. ग्रामसभेच्या ठरावाला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. पंचायत समितीने त्रुटी कळविली असती तर दूर करता आली असती. पण, यासंदर्भात ग्रामपंचायतला काहीही कळविण्यात आले नाही. त्यामुळे अर्ज सादर करणाºया नागरिकांचा हिरमोड झाला आहे. या अन्यायाविरुद्धात पंचायत समितीसमोर पात्र नागरिकांसह बेमुद उपोषण करू, असा इशारा सरपंच मोरेश्वर लोहे व ग्रा. पं. सदस्य अमोल कातकर यांनी दिला आहे.